डिजिटल गोव्यात मुक्तीनंतरही 57 वर्षांनी पाण्यासाठी सत्याग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:38 PM2018-12-20T12:38:34+5:302018-12-20T12:40:04+5:30
गोवा राज्यात आयटी हब, आयटी पार्क, डिजिटल व्यवहार, स्मार्ट सिटी आणि ई-गवर्नन्सच्या गोष्टी रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत अखंडीतपणे अलिकडे सरकार सांगत आहे.
पणजी : गोवा राज्यात आयटी हब, आयटी पार्क, डिजिटल व्यवहार, स्मार्ट सिटी आणि ई-गवर्नन्सच्या गोष्टी रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत अखंडीतपणे अलिकडे सरकार सांगत आहे. मात्र गोवा मुक्त होऊन 57 वर्षे झाली तरी, राजधानी पणजीपासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भागांना सरकार अजून पिण्याचे पाणी पुरवू शकत नाही. यामुळे गोमंतकीयांना अजूनही सत्याग्रह करावा लागत असल्याचा अनुभव सध्या येत आहे.
गोव्यात साळावली, अंजुणा, आमठाणो, चापोली, म्हैसाळ अशी धरणे आहेत. गोव्याची रोजची पाण्याची गरज जेवढी आहे, त्यापेक्षा जास्त पाणी येथे उपलब्ध आहे. मात्र 20 टक्के पाणी पुरवठ्यावेळी गळून किंवा चोरीद्वारे वाया जाते. राजधानी पणजी शहर स्मार्ट बनविण्याच्या कामात सध्या गोवा सरकार व्यस्त आहे. मात्र पणजीपासून जवळच असलेल्या ताळगाव, करंजाळे, पर्वरी, रायबंदर-कदंब पठार या भागांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. पणजीपासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हापसा शहरालाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आणि गोव्याचा विधानसभा प्रकल्प ज्या पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात येतो, त्या क्षेत्रत व पर्वरीतही पाण्याची समस्या आहे.
पर्वरीचे आमदार व मंत्री रोहन खंवटे यांनी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना नुकतेच पाणी समस्येबाबत पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली आहे. पाणी पुरवठा कार्यालयांवर मोर्चा नेऊन म्हापशाचे लोक तर थकलेच आहेत. सरकार तुयें येथे इलेक्ट्रॉनिक सिटी, चिंबलला आयटी पार्क आणतेय. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी दोनापावल येथे एक हजार कोटी रुपयांचे कनवेन्शन सेंटर बांधण्याची घोषणा केली जाते. पणजीत स्मार्ट सिटीची कामे तर पर्वरीला पहिले डिजिटल शहर बनविण्याचाही संकल्प सरकार सोडते. मात्र पणजीपासून जवळच असलेल्या कदंब पठारावरील लोकांनी पाण्यासाठी सत्याग्रह आरंभला आहे. 57 वा गोवा मुक्तीदिन सोहळा काल बुधवारी गोव्यात धुमधडाक्यात साजरा झाला. त्याचवेळी कदंब पठारावरील गोमंतकीयांनी नळाद्वारे पाणी मिळावे म्हणून सत्याग्रह केला व कथित डिजिटल गोव्याचा दुसरा चेहराही दाखवून दिला. याचवेळी डिचोलीतील साळ येथे 200 मीटरचा रस्ता बांधून मिळावा म्हणून तेथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले.