सव्वादोन लाखांचा गांजा फोंड्यात जप्त
By admin | Published: September 28, 2016 01:54 AM2016-09-28T01:54:01+5:302016-09-28T01:58:51+5:30
फोंडा : फोंडा पोलिसांनी सोमवारी रात्री (दि. २६) केलेल्या धडक कारवाईत दोन परप्रांतीयांकडून सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचा पाच किलो गांजा जप्त केला.
फोंडा : फोंडा पोलिसांनी सोमवारी रात्री (दि. २६) केलेल्या धडक कारवाईत दोन परप्रांतीयांकडून सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचा पाच किलो गांजा जप्त केला. या कारवाईत दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली.
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुर्टी-फोंडा येथील गोवा डेअरीच्या परिसरात एक युवक गांजा विकायला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून समीर बाबासाब मुल्ला (२३, मूळ रा. विक्रमनगर-कोल्हापूर, सध्या झिंगडीमळ-कुर्टी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३ किलो १९४ ग्रॅम गांजा सापडला. फोंडा पोलिसांनी संशयितास अटक केली असून उपनिरीक्षक नितीन हळर्णकर पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत बेतोडा जंक्शनजवळ प्रभाकर जयंती (वय ३४, मूळ ओडिशा) या युवकाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे १.४५ किलो गांजा आढळून आला. ही कारवाई रात्री १०.०५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी गुन्हा नोंदवला असून निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)