विद्यालयातून आदर्श विद्यार्थी शिक्षकच घडवतात: सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 10:49 AM2023-11-30T10:49:28+5:302023-11-30T10:50:33+5:30
गोमंत भूमी सुंदर असून या भूमीतील समाज ही सुंदर असणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क साळ : विद्यालये ही ज्ञानमंदिरे आहेत, ज्यातून विद्यार्थी शिक्षित होऊन समाजाप्रती आदर्श ठरतात. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्याच्या दिशेने वाटचाल करीत राहून नवा समाज घडवण्याची शक्ती त्यांच्यात निर्माण होईल. ज्यामुळे नवनिर्मितीची आस मनी बाळगली तर अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे त्यांनी प्रयत्नरत राहावे, असे उद्गार येथे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.
अनुसया नवसो कारभाटकर चॅरिटेबल ट्रस्टच्या पंधराव्या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात मये येथे सहकार मंत्री शिरोडकर हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते, भटवाडी येथील या कार्यक्रमात मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हे खास अतिथी म्हणून, तर प्रमुख वक्ते म्हणून सद्गुरु वामनराव पै यांचे शिष्य व जीवन विद्या मिशनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पालव, मयेचे सरपंच विद्यानंद कारबोटकर, ट्रस्टचे अध्यक्ष विनायक कारभाटकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मंत्री शिरोडकर म्हणाले, गोमंत भूमी सुंदर असून या भूमीतील समाज ही सुंदर असणे गरजेचे आहे. व्यसनमुक्त आणि सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शिक्षकांनीही पुढाकार घ्यावा यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवाजीराव पालव यांचे सद्गुरु शरणम या विषयांतर्गत व्याख्यान झाले. मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या मये पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या. शिष्यवृत्ती आणि गौरव, बक्षिसे प्रदान सोहळा महामाया हायस्कूल मये, विजयानंद हायस्कूल तिखाजन, पैरा हायस्कूल पैरा यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
पैरा हायस्कूलला सर्वोत्कृष्ट शाळा
तिन्ही विद्यालयामधून सर्वोत्कृष्ट शाळा हा पुरस्कार पैरा हायस्कूल - पैरा या शाळेने पटकावला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पैरा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप घाटवळ, पैरा स्कूल मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष विष्णू कामत व मॅनेजर संतोष गावकर यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्वोत्कृष्ट शाळा हा पुरस्कार मंत्री शिरोडकर व आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते पैरा हायस्कूलचे मुख्याध्यापक बाळकृष्ण गवस यांनी पुरस्कार स्वीकारला.