राज्यात कोविड पॉझिटिव्ह मतदारांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 07:15 PM2020-12-09T19:15:03+5:302020-12-09T19:15:10+5:30
कोविडग्रस्त मतदारांना सायंकाळी चार ते पाच या वेळेत मतदान केंद्रावर येऊन मतदान करायला परवानगी आहे.
पणजी : राज्यातील कोणत्या मतदान केंद्राच्या क्षेत्रात किती व कोण कोविडग्रस्त मतदार आहे याचा शोध मतदानाच्या दिवशी गटस्तरीय अधिकारी (बीएलओ) घेणार आहेत. मतदान केंद्रावर मतदान करायला येताना कोविडग्रस्त मतदारांनी अंगावर पीपीई किट व हातात मोजे घालणे गरजेचे आहे. येत्या १२ रोजी जिल्हा पंचायतींसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी कोविडच्या नजरेतून राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे बुधवारी जारी केली आहेत.
कोविडग्रस्त मतदारांना सायंकाळी चार ते पाच या वेळेत मतदान केंद्रावर येऊन मतदान करायला परवानगी आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराला थर्मल गनने तपासले जाईल. त्याला ताप आलेला आहे काय याची तपासणी होईल. जर एखादा मतदार कोविड पॉझिटीव नाही पण तो मतदान केंद्रावर आला असता, त्याला थोडा ताप असल्याचे आढळून आले तर बाजूच्या शेडमध्ये त्याला दहा मिनिटांसाठी बसवून ठेवले जाईल. पुन्हा त्याची तपासणी केली जाईल. पुन्हा देखील त्याला ताप असल्याचे स्पष्ट झाले तर मग अशा मतदाराला सायंकाळी चार ते पाच याच वेळेत मतदान करण्यासाठी या असे सांगितले जाईल.
मतदान केंद्रावरील जागा सेनिटाईज केल्या जातील. तेथील साहित्य सेनिटाईज केले जाईल. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ््यांना हातमोजे दिले जातील. कोविडग्रस्त मतदाराने कर्मचाऱ््यांना त्याच्या ओळखीचा पुरावा दाखवावा. मतदान केंद्राच्या ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे मनाई असेल. निवडणूक प्रक्रियेशीसंबंधित वाहन चालकांनी सर्व एसओपींचे पालन करावे, आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक ती काळजीघ्यावी, असे आयोगाने म्हटले आहे. मतदानाच्या दिवशी एखादा अधिकारी किंवा कर्मचारी केंद्रावरच कोविडची काही लक्षणे दाखवू लागला तर त्याला आयसोलेट केले जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे.मतमोजणीच्यावेळी सभागृहातील कर्मचाऱ््यांनी फेसमास्क घालावे. बाहेर लोकांची मोठी गर्दी होऊ देऊ नये, असे आयोगाला अपेक्षित आहे.