दोघांचा मृतदेह शोधण्याची मोहिम सुरुच, कळंगुट बीचवर बुडाले होते पाच जण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 12:53 PM2018-06-12T12:53:57+5:302018-06-12T12:53:57+5:30
पाचपैकी तिघांचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला होता.
पणजी- गोव्यात फिरायला आलेल्या अकोल्याच्या १४ पैकी पाच जणांचा बूडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे गोव्यातच नव्हे तर विदर्भाताही हळहळ व्यक्त झाली. पाचपैकी तिघांचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला होता. मंगळवारी दोघांचा मृतदेह शोधण्याची मोहिम सुरुच होती.
भारतीय नौसेना आणि जीवरक्षकांनी सकाळपासून समुद्रात खोलवर जाऊन मृतदेहाची शोधाशोध केली मात्र समुद्राच्या उसळलेल्या आणि वेगवान लाटा त्यामुळे जवानांनाही मोठी कसरत करावी लागली. दुपारपर्यंत मृतदेह हाती लागले नव्हते. किरण ओमप्रकाश मस्के व शुभम गजानन वैद्य या दोघांचे मृतदेह सापडू शकले नाहीत. किरणचे नातेवाईकही गोव्यात दाखल झाले आहेत. तसेच इतर दहा जण कळंगुट येथील एका हॉटेलात थांबले असून ते प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. आपल्या मित्रांसोबत झालेल्या घटनेमुळे इतरही पूर्णपणे बिथरलेले असल्याचे किरणचे चुलतभाउ मनोज मस्के यांनी सांगितले.
जीवरक्षक आणि नौसेनेच्या जवानांनी सकाळपासून शोध मोहिम सुरु केली होती. त्यांचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र कळंगुट किनाऱ्यावर कुठेही दगड नाहीत. तसेच समुद्रही खवळलेला आहे. त्यामुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. दोघांचेही मृतदेह मिळतील, या आशेत आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले.