धारगळ येथे १५ दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळली; सुमार दर्जाचे काम केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 11:04 AM2024-07-09T11:04:23+5:302024-07-09T11:04:59+5:30
कंत्राटदारावर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : राष्ट्रीय महामार्गावर धारगळ- महाखाजान येथे पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळली. कामाचा सुमार दर्जा दिसून आला. आजपर्यंत या कंत्राटदारावर सरकारने कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही.
धारगळ-महाखाजन येथे गेल्या पावसाळ्यात भली मोठी दरड कोसळली होती. त्यावेळी जीवितहानी झाली नाही. त्यामुळे एकेरी महामार्ग पूर्णपणे बंद केला होता. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी दरड कोसळली. ८ रोजी पुन्हा दरड कोसळली आहे. जीवितहानी झाली नसली तरी अशा दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने मोठा होण्याची भीती व्यक्त होत आहे.
११ जुलै रोजी केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी हे मोपा लिंकरोडच्या उद्घाटन समारंभाला येणार आहेत. त्यावेळी त्यांनी निदान या रस्त्याचे काम एमव्हीआर कंपनीने कसे केले, याची माहिती घ्यावी अशी नागरिक मागणी करत आहेत. दरम्यान, मालपे- न्हयबाग रस्त्यावर रविवारी दरड कोसळली. आणि उगवे येथेही रस्त्यावर दरड कोसळली. तेथे जीवितहानी झालेली नाही.
रस्ता वाहतुकीस बंद
धारगळ-महाखाजन येथे दरड कोसळलेला रस्ता एकेरी मार्गासाठी बंद करण्यात आला आहे. धारगळ ते दोन खांबपर्यंतचा एकेरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शिवाय मालपे-न्हयबाग येथील जो रस्ता बायपास महामार्ग केला आहे, तो मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे पूर्ण रस्ता बंद करून पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ खुला केला आहे. त्याच रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहतूक वळवलेली आहे.
सदोष डोंगर कापणीचा फटका
महामार्गाचे काम करताना रस्त्यांच्या बाजूला जे मोठे डोंगर आहेत ते फोडताना कंत्राटदर कंपनीने सरळ रेषेत फोडलेले आहेत. त्यामुळे दरडी कोसळण्यास संधी मिळाली आहे. डोंगरावरील काम स्लोप पद्धतीने केले असते तर काही प्रमाणात समस्या कमी झाल्या असतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.