पणजीत ‘पे पार्किंग’ चा दुसरा टप्पाही लागू होणार, आयुक्त संजित रॉड्रिग्स यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 09:56 PM2020-02-19T21:56:47+5:302020-02-19T21:57:19+5:30
हॉटेल व्यावसायिक किंवा टुरिस्ट टॅक्सीवाल्यांना ‘पे पार्किंग’मध्ये सवलत देण्याची शक्यता आयुक्तांनी फेटाळून लावली.
पणजी : शहरात ‘पे पार्किंग’चा दुसरा टप्पाही लागू होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी दिली. ते म्हणाले की, गेल्या १५ तारीखपासून पहिला टप्पा सुरु झाला त्यानंतर १८ जून मार्ग तसेच शहरातील अन्य प्रमुख मार्गांवरील पार्किंग विभागातील २0 ते ३0 मोटारी मावतील एवढी जागा मोकळी झालेली आहे. शहरातील वाहतूकही सुरळीत झालेली आहे.
रेंट ए बाइक किंवा टुरिस्ट टॅक्सीवाले आता ‘पे पार्किंग’ लागू नसलेले रस्ते अडविण्याची शक्यता आहे त्याबाबत विचारले असता आयुक्त म्हणाले की, ‘दुस-या टप्प्यात आणखी काही रस्त्यांवरही पे पार्किंग लागू केले जाईल. टप्प्याटप्प्यांनी पे पार्किंग लागू होणार आहे. लोकांच्या काही गोष्टी अंगवळणी पडणे आवश्यक आहे.’
हॉटेल व्यावसायिक किंवा टुरिस्ट टॅक्सीवाल्यांना ‘पे पार्किंग’मध्ये सवलत देण्याची शक्यता आयुक्तांनी फेटाळून लावली. ज्या जुन्या इमारती आहेत आणि बांधकामांच्या वेळी त्यांनी सादर केलेल्या प्लॅनमध्ये पार्किंगची व्यवस्था दाखवलेली नसेल, तर त्यांना पे र्पाकिंग शुल्काबाबत सूट आहे. परंतु ज्यांनी पार्किंग जागेचे रुपांतर खोल्या किंवा गाळ्यांमध्ये केले असेल तर त्यांना मुभा मिळणार नाही, असे सांगण्यात आले.
दरम्यान, महापौरांनी यावेळी कोणाचेही नाव न घेता असा आरोप केला की, ‘एक माजी आमदार जुनी अधिसूचना सोशल मिडियावर व्हायरल करीत आहे. ‘पे पार्किंग’चे नवे दर अधिसूचित झाल्यानंतरच आम्ही ते लागू केलेले आहेत. लोकांनी मनात गोंधळ करुन घेऊ नये.’