गुप्त मतदानाला तिलांजली
By admin | Published: February 12, 2017 02:30 AM2017-02-12T02:30:52+5:302017-02-12T02:30:52+5:30
गोव्यात गुप्त मतदान पद्धत आणि लोकशाहीची थट्टा सुरू असून निवडणुकीच्या कामावर असलेले सरकारी कर्मचारी उमेदवार तसेच आमदार-मंत्र्यांना मतपत्रिका दाखवून त्यांच्यासमोरच
- सद्गुरु पाटील, पणजी
गोव्यात गुप्त मतदान पद्धत आणि लोकशाहीची थट्टा सुरू असून निवडणुकीच्या कामावर असलेले सरकारी कर्मचारी उमेदवार तसेच आमदार-मंत्र्यांना मतपत्रिका दाखवून त्यांच्यासमोरच मतपत्रिकेवर मतदान करत आहेत.
निवडणूक कामावरील सरकारी कर्मचाऱ्यांना पोस्टाने मतपत्रिकेद्वारे मतदान करायला मिळते. मात्र, यंदा सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना मतदानासाठी एक महिन्याची मुदत मिळाली आहे. शिक्षक, अभियंते, कारकून, पोलीस, अव्वल कारकून असे हजारो कर्मचारी निवडणूक कामावर होते. त्यांच्या हाती मतपत्रिका आहेत.
बहुतांश कर्मचारी जो उमेदवार निवडून येईल असे वाटते किंवा जो आमदार किंवा मंत्री पुन्हा निवडून येईल असे वाटते, त्याला गाठून आपली राजकीय निष्ठा दाखवू लागले आहेत. उमेदवारांना मतपत्रिका दाखवून ‘पाहा, मी तुमच्यासमोरच मतदान करत आहे,’ असे कर्मचारी सांगत आहेत. काही कर्मचाऱ्यांना आमदार व संबंधित उमेदवारांची शाबासकी मिळत आहे, तर काही कर्मचाऱ्यांना उमेदवारांकडून पैसेही मिळू लागले आहेत, अशी माहिती आहे.
काही उमेदवार व आमदारांनी मतदारसंघातील कोणते व किती सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामावर होते, त्याची यादी तयार करून त्या कर्मचाऱ्यास गाठण्याचे प्रकार सुरू केले आहेत. मोजक्याच कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे मतदान करण्याचा मार्ग पत्करला आहे. बहुतांश कर्मचारी मतपत्रिका उमेदवारांकडे व आमदारांकडे नेऊन त्यांच्याच हस्ते मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर व चिन्हासमोर फुली मारून घेऊ लागले आहेत. गोव्यात पहिल्यांदाच हा प्रकार घडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या प्रकारांच्या तक्रारी पोहोचल्या आहेत. काही मतदारसंघांतील निकालांवर या गैरप्रकारांचा परिणाम होणार आहे.