पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी कळंगुट परिसरात सुरक्षा रक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 06:03 PM2018-09-23T18:03:50+5:302018-09-23T18:04:14+5:30
कळंगुट तसेच कांदोळी या किनारी भागात येणा-या पर्यटकांना तसेच स्थानिकांना त्रास देणा-या फिरत्या विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच हा भाग विक्रेत्यांपासून मुक्त ठेवून पर्यटकांना सहकार्य देण्यासाठी व या भागातील वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहे.
म्हापसा: कळंगुट तसेच कांदोळी या किनारी भागात येणा-या पर्यटकांना तसेच स्थानिकांना त्रास देणा-या फिरत्या विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच हा भाग विक्रेत्यांपासून मुक्त ठेवून पर्यटकांना सहकार्य देण्यासाठी व या भागातील वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहे.
कळंगुट मतदार संघाचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी या संबंधीची माहिती दिली. या भागातील फुटपाथ तसेच किना-यावर फिरुन विविध वस्तूंची विक्री करणा-या फिरत्या विक्रेत्यांपासून लोकांना तसेच पर्यटकांना बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे किना-यावरील आनंद लुटण्यापासून ते वंचित राहतात. त्यांच्यापासून होणा-या त्रासा संबंधी अनेक तक्रारी दाखल झाल्याने या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या सुरक्षा रक्षकांचा वापर केला जाणार आहे. तशी माहिती लोबो यांनी दिली. सुरक्षा रक्षकांच तैनातीमुळे लोक किना-याचा तसेच परिसराचा चांगल्या प्रकारे आनंद लुटू शकतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भागात येणा-या पर्यटकांमुळे वाढती वाहतूक लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा या सुरक्षा रक्षकांचा वापर केला जाणार आहे. येणा-या पर्यटकांना अनेकवेळा वाहने पार्क करण्यासंबंधीचे ज्ञान नसल्याने तसेच कुठल्या कुठेही वाहने पार्क असल्याने काहीवेळा स्थानिक लोकांच्या घरासमोर वाहने पार्क केली जात असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे सुरक्षा रक्षक मोक्याच्या ठिकाणी तैनात केले जाणार आहेत. त्यांच्यामुळे वाढती वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. कांदोळी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर बोलताना लोबो यांनी ही माहिती दिली. यावेळी पंचायतीचे सरपंच ब्लेझ मिनेझीस उपस्थित होते.
सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सरकारकडून मान्यता लाभल्यानंतर पुढील निवीदा प्रक्रिया करुन सुरक्षा रक्षकांची नेमणुक करण्यात येणार आहे. कळंगुटच्या प्रवेशद्वारापासून ते कांदोळीपर्यंत त्यांचा वापर केला जाणार आहे. हे सुरक्षा रक्षक स्थानीक पोलीस तसेच वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने काम पाहतील. पोलिसांच्या सहकार्याने काम केल्याने त्याच्यावर वाढणारा ताण दूर होण्यास मदत होणार आहे.