गोव्यात अतिरेकी शिरण्याचा तो 'अलर्ट' खोटा; सागर कवच प्रात्यक्षिकाचा होता भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 09:36 PM2018-04-07T21:36:00+5:302018-04-07T21:36:00+5:30
या पार्श्वभूमीवर शेतकरी, वॉटर स्पोर्ट संचालकांना आणि जहाज मालकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
पणजी: गोव्यात समुद्रमार्गे अतिरेकी शिरण्याची शक्यता आहे. तटरक्षक दलाने आणि समुद्रात संचार करणाऱ्यांनी सतर्क रहावे, असा अलर्ट गुप्तचर विभागाकडून देण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी, वॉटर स्पोर्ट संचालकांना आणि जहाज मालकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आज संध्याकाळी हा अलर्ट खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
राज्यात सागर कवच प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली आहेत. समद्रमार्गे आत शिरणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. कॅप्टन ऑफ पोर्टस, तटरक्षक दल आणि किनारा पोलीस विभागाकडून संयुक्तरित्या या कारवाया सुरू आहेत. याच प्रात्यक्षिकांचा भाग म्हणून आज सकाळी अतिरेकी गोव्यात घुसण्याचा अलर्ट जारील करण्यात आला होता. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी तशी माहिती पत्रकार व इतरांना पहिल्या दिवशी दिली नसल्यामुळे खरोखरच अतिरेकी अलर्ट आहे की काय, असे अनेक लोकांना वाटले. खरी गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी 'दैनिक लोकमत'चा फोन दिवसभर खणखणत होता.
काही वृत्तपत्रांनी अतिरेकी अलर्टच्या बातम्याही छापून आणल्यामुळे या गोंधळात आणखी भर पडला. विशेष म्हणजे पोलिस खात्याला कोणताही अलर्ट नाही आणि कॅप्टन ऑफ पोर्ट व तटरक्षक दलाला अलर्ट आहे असे सांगण्यात आले होते. अशा प्रकारचा अलर्ट असण्याची शक्यता फारच कमी असते. भारतीय गुप्तचर विभागाकडून अलर्ट आलेला असल्यास तो गोवा पोलिसांना जाणे अनिवार्य असते. त्यामुळे हा प्रात्यक्षिकांचाच भाग असावा हे स्पष्ट झाले होते.
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर देशाला समुद्रामार्गे धोका संभवू शकतो, हे पहिल्यांदाच स्पष्ट झाले होते. त्यामुळे अशा घटना भविष्यात घडल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवण्यात यावी, यासाठी सागर कवच प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली. एकाचवेळी जमिनीवर, किनाऱ्यांवर आणि समुद्रात ही प्रात्यक्षिके होतात. नकली अतिरेक्यांकडून नकली बॉम्बही ठेवले जातात. नियोजित जागी बॉम्ब ठेवण्याचे आव्हान काही जणांकडे असते तर त्यांना रोखण्याचे आणि बॉम्ब ठेवल्यास ते शोधून काढण्याचे आव्हान इतर पोलिसांवर असते.