भाऊ-भाई लढतीत रंगत; उत्तरेची एकतर्फी वाटणारी निवडणूक इंटरेस्टींग अन् तिरंगी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2024 01:29 PM2024-04-21T13:29:18+5:302024-04-21T13:30:35+5:30

उत्तर गोव्यात ५.७ लाख मतदार आहेत. ७० टक्के मतदान अपेक्षित धरले तर २ लाख मते ही विजयाचे लक्ष्य ठरत आहेत.

seemingly one sided goa election 2024 in the north will be interesting and three way | भाऊ-भाई लढतीत रंगत; उत्तरेची एकतर्फी वाटणारी निवडणूक इंटरेस्टींग अन् तिरंगी होणार

भाऊ-भाई लढतीत रंगत; उत्तरेची एकतर्फी वाटणारी निवडणूक इंटरेस्टींग अन् तिरंगी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोवा मतदारसंघ हा आतापर्यंत भाजपचा भरवशाचा गड ठरला आहे. त्यामुळे यावेळी सुरुवातीला उत्तरेत भाजप सहज बाजी मारेल, अशी चर्चा सुरू होती मात्र, काँग्रेसने रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे लढत रंगत आणू लागली आहे. खलप हे इंडिया आघाडीतर्फे तर अनुभवी श्रीपादभाऊ भाजपतर्फे लढताना पूर्ण उत्तर गोवा फिरत आहेत. आरजीचे उमेदवार मनोज परबही रिंगणात असल्याने लढत इंटरेस्टींग ठरू लागली आहे. 

परब हे दोन्ही पक्षांची थोडी मते फोडतील. शिवाय उत्तरेत आरजीची मते आहेतच. श्रीपाद नाईक यावेळी सहाव्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. नाईक उत्तर गोव्यात कधीच निवडणूक हरलेले नाहीत. सत्तरी, बार्देश, डिचोली व तिसवाडी या तालुक्यांकडून भाजप जास्त अपेक्षा ठेवून आहे. उत्तर गोवा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळीही भाजपला या मतदारसंघात विजयाचा पूर्ण भरवसा आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपची उमेदवारी लवकर जाहीर झाल्यामुळे प्रचारालाही श्रीपाद नाईक यांनी लवकरच सुरूवात करून दोन फेऱ्याही पूर्ण केल्या.

काँग्रेसतर्फे खलप मैदानात असल्यामुळे त्यांचे आव्हान हलकेपणे घेता येणार नाही. कारण, उत्तर गोवा कितीही भाजपसाठी लाभदायक असला तरी 'अँटी इन्कॅबन्सी'ला उमेदवाराला सामोरे जावे यावेळी भाजप लागत आहे. भाजपकडे जास्त संख्येने मंत्री, आमदार आहेत, माजी मंत्रीही आहेत. काँग्रेसकडे एकच आमदार व काही माजी आमदार अशी स्थिती आहे. सत्तरी तालुक्यात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे काही काँग्रेसच्या प्रचारात उतरलेले नाहीत.

अॅड. रमाकांत खलप यांनी उशीरा प्रचार सुरू केला असला तरी आपल्या टीमसह ते झोकून देऊन काम करीत आहेत. अनेक मतदार संघात पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यावेळी आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. जुने कार्यकर्ते शोधून खलप त्यांना घेऊन फिरत आहेत. काल ते पर्तगाळी येथे जाऊन तेथील स्वामींचीही भेट घेऊन आले.

खलप पैसे खर्च करीत नसल्याने कार्यकर्ते चलबिचल

लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात ७ मे रोजी मतदान होणार असून भाजप, काँग्रेस व रिव्होल्यूशनरी गोवन्सचे उमेदवार व कार्यकर्ते प्रचारात व्यस्त आहेत. मात्र, सध्या उत्तर गोवा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप म्हणे प्रचारासाठी पैसेच खर्च करीत नसल्याची चर्चा रंगली आहे. खलप स्वतः खर्च करत नसल्याने कार्यकर्ते चलबिचल झाल्याची चर्चा इंडिया आघाडीच्या सदस्यांमध्ये आहे.

भंडारी व मराठा निर्णायक

दरम्यान, यावेळी उत्तर गोव्यातील भंडारी समाज कोणती भूमिका बजावतो ते पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. यापूर्वी भाऊंनी एका निवडणुकीत रवी नाईक यांचा तर दुसऱ्या निवडणुकीत गिरीश चोडणकर यांचा पराभव केलेला आहे. त्यावेळी भंडारी समाजाची साथ श्रीपादभाऊंनाच जास्त लाभली होती. यावेळी काही वादाचे विषय आले तरी, समाजाची मते कशी व कोणत्याबाजूला वळतात ते पहावे लागेल. मराठा समाज हा पेडणे, डिचोली व सत्तरी तालुक्यात जास्त आहे. पेडणे व डिचोलीच्या मराठा समाजाकडे काँग्रेसने जास्त लक्ष वळवल्याचे दिसते.
 

Web Title: seemingly one sided goa election 2024 in the north will be interesting and three way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.