वृद्ध इसमाच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेली गांजा रोपटी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 09:19 PM2020-05-03T21:19:42+5:302020-05-03T21:20:01+5:30
याप्रकरणात ६३ वर्षीय वृद्ध पोलीसांच्या अटकेत
वास्को: दक्षिण गोव्यातील साकवाळ या गावात राहणाºया आयरिन्यू रॉड्रीगीस या वृद्ध इसमाने आपल्या घराच्या हद्दीत गांजाची रोपटी लावून त्याची तो देखभाल करत असल्याची माहीती वेर्णा पोलीसांना मिळताच शनिवारी (दि. २) उशिरा रात्री त्याच्या घरी छापा मारण्यात आला. या छाप्यात पोलीसांनी ३ कीलो ७६२ ग्राम वजनाची गांजाची रोपटी जप्त केली असून आयरिन्यू यास अटक केली. आयरिन्यू यास रविवारी (दि. ३) न्यायालयात उपस्थित केला असता त्यास एक दिवसाच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी उशिरा रात्री सदर कारवाई करण्यात आली. साकवाळ येथे असलेल्या ‘ओल्ड चर्च’ परिसरातील एका घरात बेकायदेशीर गांजा रोपटी लावण्यात आल्याची माहीती पोलीसांना मिळाली. सदर माहीती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत तसेच इतर पोलीस कर्मचाºयांनी कारवाई करत साकवाळ भागात राहणाºया ६३ वर्षीय आयरिन्यू रॉड्रीगीस याच्या घरावर छापा मारला. या छाप्यात आयरिन्यू या वृद्ध इसमाने त्याच्या घराच्या परिसरात गांजाची रोपटी लावलेली असून तो त्यांची देखभाल करत असल्याचे पोलीसांना स्पष्ट झाले. सदर प्रकरणात पोलीसांनी पंचनामा करून येथून ३ किलो ७६२ ग्राम वजनाची गांजा रोपटी जप्त केली. या अमली पदार्थाची कींमत ३ लाख ७६ हजार रुपये असल्याची माहीती वेर्णा पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आपल्या घराच्या परिसरात गांजाची रोपटी लावून त्यांची देखभाल करत असल्याच्या प्रकरणात पोलीसांनी आयरिन्यू विरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या २०(ए)(१) कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यास शनिवारी उशिरा रात्री अटक केली. सदर प्रकरणात आयरिन्यू याच्याबरोबर अन्य कोणाचा समावेश आहे काय याबाबतची पोलीस सद्या चौकशी करत आहेत.
दरम्यान ६३ वर्षीय आयरिन्यू यास रविवारी न्यायालयात उपस्थित केला असता त्यास १ दिवसाच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश बजावण्यात आला. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कीरण नाईक अधिक तपास करीत आहेत.