लेझर रन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात गोव्याच्या खेळाडूंची निवड
By समीर नाईक | Published: May 25, 2024 03:35 PM2024-05-25T15:35:50+5:302024-05-25T15:36:12+5:30
लेझर रन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवडण्यात आलेल्या संघात गोव्याचा स्टार मॉडर्न पेंटॅथलॉनपटू बाबू अर्जुन गावकर, याच्यासोबत उद्देश पंढरी माजीक, यश शंकर नाईक, सोहा योगेश दलाल, व वैष्णवी सुरेश वाडकर यांचा या संघात समावेश आहे.
पणजी : चीन, झेंगओ येथे युआयपीएम या आधुनिक पेंटॅथलॉन ऑलिम्पिक खेळांच्या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्थेतर्फे दि. ७ ते १० जून २०२४ या कालावधीत आयोजीत केलेल्या युआयपीएम- लेझर रन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाने आपला संघ जाहीर केला आहे. या भारतीय संघात ५ गोमंतकीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
लेझर रन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवडण्यात आलेल्या संघात गोव्याचा स्टार मॉडर्न पेंटॅथलॉनपटू बाबू अर्जुन गावकर, याच्यासोबत उद्देश पंढरी माजीक, यश शंकर नाईक, सोहा योगेश दलाल, व वैष्णवी सुरेश वाडकर यांचा या संघात समावेश आहे.
अमरावती येथे नुकत्याच झालेल्या ८ व्या लेझर रन राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे वरील खेळाडूंची निवड करण्यात आली. या स्पर्धेत बाबू अर्जुन गावकर याने सिनियर गटात दर्जेदार कामगिरी करत सुवर्ण पदक प्राप्त केले होते. तर उद्देश पंढरी माजीक याने १९ वर्षाखालील गटात सुवर्ण पदक प्राप्त करत गोव्याचे नाव उज्वल केले होते. बाबू गावकरने ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पाहिले सुवर्ण पदक प्राप्त करून दिले होते.
वरील पाच खेळाडूंची भारतीय संघात निवड झाल्यामुळे गोवा मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेच्या सचिव संध्या पलियेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले, आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.