उपद्रवी पर्यटकांचे फोटो पाठवा, कारवाई करू - आजगावकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 05:06 PM2019-01-16T17:06:17+5:302019-01-16T17:16:42+5:30
गोव्यात येऊन उपद्रव करणाऱ्या व किनाऱ्यांवर दारूच्या बाटल्या फोडणाऱ्या पर्यटकांविरुद्ध यापुढे पर्यटन खातेच कारवाई करेल, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी येथे लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.
पणजी - गोव्यात येऊन उपद्रव करणाऱ्या व किनाऱ्यांवर दारूच्या बाटल्या फोडणाऱ्या पर्यटकांविरुद्ध यापुढे पर्यटन खातेच कारवाई करेल, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी येथे लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.
पर्यटन खात्याचे अधिकारी व पर्यटक पोलीस मिळून ही कारवाई करतील. आपण पर्यटन खात्याच्या संचालकांना बुधवारीच त्यासाठी काही सूचना केल्या. कायद्यात दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे आपण संचालकांना सूचविले आहे, असे मंत्री आजगावकर म्हणाले. किनाऱ्यांवर पर्यटक सध्या खूप उपद्रव करतात आणि मद्य पिण्याबरोबरच बाटल्याही तिथेच फोडून किंवा आहे त्याच स्थितीत टाकून देतात अशा तक्रारी लोक करत आहेत. कळंगुटचे आमदार तथा भाजपाचेच एक नेते मायकल लोबो यांनीही तशीच तक्रार केली व याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गृह खात्याला थेट दोष दिला. त्याविषयी बोलताना मंत्री आजगावकर म्हणाले, की आपण लोबो यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पर्यटन खात्याचा दोष नाही असे मला सांगितले. गृह खात्याने जी अधिसूचना जारी करायला हवी होती, ती केली नाही असे लोबो यांचे म्हणणे आहे. आता आम्ही पर्यटन खात्यामार्फतच कारवाई सुरू करू. खात्याचे अधिकारी जे किनाऱ्यांच्या क्षेत्रात काम करतात, त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाईल. पर्यटन खात्याशी जोडले गेलेले जे पर्यटक पोलीस आहेत, त्यांचीही मदत घेतली जाईल. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती तातडीने करून घेऊ.
मंत्री आजगावकर म्हणाले, की जर किनाऱ्यांवर कुणीही पर्यटक दारू पिताना किंवा उघड्यावर स्वयंपाक करताना किंवा किनाऱ्यांवर दारूच्या बाटल्या फोडताना दिसत असतील तर फोटो काढून लोकांनी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या व पर्यटक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवावेत. आम्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर करणार आहोत. फोटो मिळाल्यानंतर पर्यटकांविरुद्ध कारवाई केली जाईल. आताही किनाऱ्यांवर जर कचरा साठलेला आहे, असे दाखवून देणारा फोटो लोकांनी पाठविला की, खात्याचे अधिकारी लगेच किनाऱ्याची स्वच्छता करून घेण्यासाठी मनुष्यबळ पाठवतात.