महाराष्ट्रातील पुराच्या नुकसानीचा प्रस्ताव पाठवा- गृहमंत्री अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 02:16 AM2019-08-23T02:16:04+5:302019-08-23T02:16:23+5:30
गेल्या वर्षी गुजरातमध्ये बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे आणि त्यावरील प्रगतीची समीक्षा यावेळी करण्यात आली.
पणजी : महाराष्ट्र आणि गोव्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज बांधून राज्य सरकारांनी केंद्राकडे लवकर प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केले. पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
पश्चिम विभाग मंडळाची २४ वी बैठक शहा यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तसेच दमण व दीव आणि दादरा-नगर हवेलीचे प्रशासक बैठकीला उपस्थित होते. सुरक्षा, आरोग्य व समाजकल्याण या विषयांवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यासाठी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही बैठक होती.
ते म्हणाले की, पश्चिम क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. पश्चिम क्षेत्राचा जीडीपीमध्ये सुमारे २४ टक्के, तर एकूण निर्यातीत वाटा ४५ टक्के आहे. त्यामुळे या राज्यांसंबंधी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जाईल. या राज्यांनी सहकार क्षेत्राला चालना दिली.
साखर, कापूस, भुईमूग आणि मासे यांची निर्यात या भागांतून जास्त होत आहे. देशाच्या आर्थिक विकासात या राज्यांचा मोठा वाटा
आहे.
गेल्या वर्षी गुजरातमध्ये बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे आणि त्यावरील प्रगतीची समीक्षा यावेळी करण्यात आली.
यात महाराष्ट्राच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा आराखडा, बँकिंग सुविधेपासून वंचित असलेल्या गावांमध्ये बँकांच्या शाखा उघडणे, थेट लाभार्थी योजनेशी संबंधित पोर्टलच्या माध्यमातून माहितीचे संकलन, मच्छीमारांना क्यूआर कोड प्रणालीचे ओळखपत्र आणि ‘पोस्को’ कायद्यातील तरतुदींविषयी तपशीलवार चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींवर संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी दर महिन्याला आढावा बैठक घेण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली.