ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेशबाब निवर्तले; प्रखर राष्ट्रवादाचा अढळ दीपस्तंभ कोसळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:25 AM2023-02-10T10:25:02+5:302023-02-10T10:25:55+5:30
गोवा मुक्ती लढयात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा कोकणी साहित्यिक नागेश करमली (१०) यांचे चिंबल येथे राहत्या घरी निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा मुक्ती लढयात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा कोकणी साहित्यिक नागेश करमली (१०) यांचे चिंबल येथे राहत्या घरी निधन झाले. राष्ट्रवादाचा एक अढळ दीपस्तंभ उन्मळून पडला.
करमली यांनी मुक्तीला स्वतःला झोकून देताना पोर्तुगिजांकडून अमानुषपणे मारहाणही सहन केली. माध्यम प्रश्नावर आंदोलनात मातृभाषा रक्षणार्थ भाभासुमच्या माध्यमातून ते अत्यंत पोटतिडकीने वावरले. ते हाडाचे स्वातंत्र्यसैनिक होते. अराष्ट्रीय कृत्यावर ते तुटून पडत असत.
करमली यांनी कोकणीतून विपुल लेखन केले आहे. मराठी वर्तमानपत्रांमध्येही त्यांनी स्तंभलेखन केले आहे. आकाशवाणी पणजी केंद्रावर त्यांनी अनेक वर्षे काम केले आणि तिथूनच ते सेवानिवृत्तही झाले. १९८०च्या दशकात आकाशवाणी पणजी केंद्रावर फोडणी फोंव' या कार्यक्रमासाठी ते पटकथा लिहायचे त्यात 'राजाराम राटावळी' हे त्यांचे पात्र बरेच गाजले. करमली यांच्या पार्थिवावर सांतिनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान, करमली यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह कोकणी भाषा मंडळाने आदरांजली वाहिली. करमली कोकणी भाषा मंडळाच्या संस्थापकांपैकी एक होते. नवीन लेखक आणि कार्यकर्त्यांना ते नेहमीच प्रोत्साहन देत असत. त्यांच्या निधनाने कोकणी माणसाची झालेली हानी कोणीही भरून काढू शकत नाही, असे मंडळाचे अध्यक्ष अन्वेशा सिंगबाळ यांनी मंडळाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"