गोव्यातील मडगाव पालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणा-यांवर आता सेन्टिनलची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 08:07 PM2019-07-03T20:07:15+5:302019-07-03T20:07:17+5:30
गोव्याची आर्थिक राजधानी म्हणून गणल्या जाणा-या मडगाव शहरात आता उघड्यावर कचरा टाकणा-यांवर सेन्टिलनची कडक नजर राहणार आहे.
मडगाव: गोव्याची आर्थिक राजधानी म्हणून गणल्या जाणा-या मडगाव शहरात आता उघड्यावर कचरा टाकणा-यांवर सेन्टिलनची कडक नजर राहणार आहे. आज पालिका मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक तसेच प्रभारी नगराध्यक्ष टिटो कादरेज यांनी कचरा सेन्टीनल योजना जारी केली. सद्या पालिका क्षेत्रातील सोनसोडो कचरा यार्डात वर्गीकरण न केलेल्या कचरा घेतला जात नसल्याने तसेच शहरात मिळेल तेथे कचरा टाकला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात कच-याचा ढीग साचत आहे. उघड्यावर कचरा टाकणा-यांवर आता सेन्टीनल नजर ठेवणार आहेत.
वॉटसअपच्या माध्यमातून 8390208406 या क्रमाकांवरून कचरा टाकणा-याचा व्हिडीओ वा त्याचे छायाचित्र अथवा वाहन क्रमांक टिपून पाठवावा. सेन्टीनलने आपले नाव, वय, तारीख, पत्ता तसेच कचरा टाकला जात आहे तेथील पत्ता व वेळेची नोंद द्यावी असेही सुचविण्यात आले आहे. सेन्टीनलची माहिती गोपनीय ठेवली जाईल. त्यांना एका प्रकरणात एक हजार रुपये दिले जाईल तर कचरा टाकणा-यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल अशी माहिती पालिका मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिली.
मडगाव पालिकेने कचरा प्रश्न गांभीर्यतेने घेतला आहे. मंगळवारी पालिकेचे सफाई विभाग निरीक्षकांनी कचरा टाकणा-यांना पकडून त्यांना समज दिली आहे. उघड्यावर कचरा टाकणा-यांची गय केली जाणार नाही. शेजारच्या पंचायत क्षेत्रातील लोक कचरा टाकत आहेत. हॉस्पिसियोच्या आवारात कचरा साचला असल्याची माहिती पत्रकारांनी दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेतली गेली असल्याचेही नाईक म्हणाले. प्रभारी नगराध्यक्ष टिटो कादरेज यांनी या सेन्टीनलची माहिती पत्रकारांना देताना लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.