कळंगुटमधील पुतळा हटवणे हाच सिक्वेरांचा उद्देश; शिवस्वराज्य समितीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:41 AM2023-06-29T10:41:57+5:302023-06-29T10:42:48+5:30
शिवप्रेमींनी संयम राखावा.
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादात सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी आपला हट्ट बाजूला ठेवावा. महाराजांनी ज्या प्रकारे शासन चालवले, त्यापासून धडा घेऊन आपले शासन चालवावे. त्यांनी जे केले आहे, त्याला माफी नाही. त्यांच्या मनात महाराजांचा पुतळा हटवणे हेच असल्याने ते आपल्या विधानात वारंवार बदल करीत आहेत, असा आरोप शिवस्वराज्य समितीकडून करण्यात आला.
कळंगुट येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रकार समितीकडून ही माहिती देण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकर, सुदेश मयेकर, सिद्धीक गोवेकर तसेच प्रज्योत कळंगुटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जमीनदोस्त आणि हटवणे तसेच चूक मागणे आणि माफी मागणे या शब्दांतील फरक त्यांनी जाणून घेण्याची गरज आहे. सिक्वेरा फक्त शब्दांचा खेळ करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांना जर भाषेचे ज्ञान असते, तर शब्दांतील फरक त्यांना समजून आला असता. त्यामुळे त्यांना इंग्रजी पुन्हा शिकून घेण्याची गरज आहे, असे मयेकर म्हणाले.
नव्या जागी पुतळ्याच्या उभारणीसाठी सिक्वेरांना जर पर्याय घ्यायचा असेल तर कळंगुट क्षेत्रात चार सर्कल आहेत त्यातील एक जागा शिवप्रेमींना उपलब्ध करून देण्यात यावी. तसे करण्यापूर्वी सिक्वेरांनी शिवप्रेमींना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे मत मयेकर यांनी व्यक्त केले.
हा विषय संवेदनशील असल्याने पंचायतीकडून समितीला पत्र पाठवण्यापूर्वी पत्रामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार होणे गरजेचे होते. पुतळ्यासाठी गावातील लोकांकडून निधी उभारण्यात आला होता. याची जाण सिक्वेरांना होती. तसेच पुतळ्याची उभारणी करण्यापूर्वी पूर्ण गावाला त्याची माहिती होती. लोकांना विश्वासात घेण्यात आले होते, असे मयेकर म्हणाले.
पुतळ्याची उभारणी घाईगडबडीत करण्यात आली, हा आरोप शिवस्वराज्य संस्थेकडून फेटाळण्यात आला. सिक्वेरा यांनी सप्टेंबरमध्ये त्याची माहिती देण्यात आली, असेही सांगण्यात आले. त्यांनी त्याची दखल घेतली नाही किंवा संबंधित खात्याला पाठवले नाही.
पंचायतीला सादर केलेल्या प्रस्तावानंतर सिक्वेरांनी हायमास्ट दिव्याची उभारणी करण्यासाठी घाईगडबडीने खोदकाम आरंभले. प्रस्तावानंतर गडबड करण्याचे कारण काय होते? असा प्रश्न करून त्यातून त्यांच्या मनात काय होते, ते स्पष्ट होते. महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी पंचायतीकडून असहकार्य केले.
जेथे त्यांनी वाहतूक बेटाच्या उभारणीसाठी खोदकाम सुरू केले होते ती जागा पायाभूत महामंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. पंचायतीची नसल्याचेही निदर्शनाला आणून देण्यात आले. पुतळ्याची उभारणी करून २३ दिवस पूर्ण झाले. अद्याप एकही अपघात घडला नाही किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला नाही. वाहतुकीला त्रास होत असल्यास संबंधित खात्यांनी येऊन पाहणी करावी, असे आवाहन मयेकर यांनी केले.
सिक्वेरा यांनी शिवस्वराज्य समितीला दिलेल्या दोषाचे समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकर यांनी खंडन केले. समितीने कोणतेच बेकायदेशीर कृत्य केले नाही. त्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे सांगण्यात आले.
पत्र मागे घेण्यात आले नसल्याचे सिक्वेरा यांनी केलेले विधान दिशाभूल करणारे आहे. ते फक्त खोटे बोलतात. त्याला शिवप्रेमींनी बळी पडू नये, असेही आवाहन मठकर यांनी केले.
पुतळा हटवण्यासाठी दिलेला आदेश मागे घेणे शक्य नाही. या मुद्यावर कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनेच्या दिवशी आपण माफी मागितली आहे. पंचायतीने घेतलेल्या निर्णयावर आपण कायम राहणार आहे. - जोसफ सिक्वेरा, सरपंच कळंगुट