गोव्यात अपघाताची मालिका सुरुच; मुंगुल येथे दुचाकीच्या अपघातात झारखंडच्या दोन जणांचा मृत्यू
By सूरज.नाईकपवार | Published: April 15, 2024 05:12 PM2024-04-15T17:12:13+5:302024-04-15T17:12:56+5:30
वाहनावरील ताबा सुटून प्रथम सरंक्षण कठड्याला धडक दिली, नंतर वीजेच्या खांबाला दुचाकीने जोरदार धडक दिली.
सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गोव्यात अपघाताची मालिका सुरुच असून, राज्यातील सासष्टीतल्या मुंगुल येथे रविवारी रात्री एका अपघातात मूळ झारखंड राज्यातील दोन मित्रांचा मृत्यू झाला. दालू कुजार व जीवन सोरेन अशी मयताची नावे आहेत. ते दोघेही मूळ झारखंड राज्यातील असून, कोळंब रिवण येथे ते राहत होते.
दुचाकीवरुन मडगावहून ते कोलवा येथे जात होते. त्यावेळी वाहनावरील ताबा सुटून प्रथम सरंक्षण कठडयाला धडक दिली व नंतर वीजेच्या खांब्याला दुचाकीने जोरदार धडक दिली व हा अपघात घडल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली.पोलिसांच्या अंदाजानुसार रात्री सव्वा अकराच्या दरम्यान अपघाताची वरील घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमींना १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्सच्या सेवेतून येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
घटनास्थळी पोलिसांनी हॅल्मेटही आढळून आले आहे. उपलब्ध माहितीनुसार जीवन हा अल्पवयीन असून, त्याचे वय १७ तर दालू हा २१ वर्षाचा आहे. मयताचे कुटुंब झारखंड येथे रहात असून, त्यांच्या कुटुंबियाकडे पोलिसांनी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली आहे. मृतदेह येथील इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. संबधितांचे कुटुंब गोव्यात पोहचल्यानंतर मृतदेहावर शवचिकित्सा केली जाणार आहे. उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर पुढील तपास करीत आहेत.