करबुडव्यांमागे ससेमिरा

By admin | Published: October 29, 2014 01:05 AM2014-10-29T01:05:25+5:302014-10-29T01:09:32+5:30

पणजी : राधा एस. तिंबलो यांच्या कंपनीचे नाव विदेशातील बँक खाते आणि काळ्या पैशांच्या यादीत आल्यानंतर राज्यातील अनेक बड्या खाण कंपन्यांच्या वेगवेगळ्या व्यवहारांविषयी राज्यभर चर्चा होऊ लागली आहे.

Sesamira after the taxbudva | करबुडव्यांमागे ससेमिरा

करबुडव्यांमागे ससेमिरा

Next

पणजी : राधा एस. तिंबलो यांच्या कंपनीचे नाव विदेशातील बँक खाते आणि काळ्या पैशांच्या यादीत आल्यानंतर राज्यातील अनेक बड्या खाण कंपन्यांच्या वेगवेगळ्या व्यवहारांविषयी राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्स संचालनालयाने (डीआरआय) यापूर्वीच राज्यातील सहा कंपन्यांची कथित करचुकवेगिरीबाबत चौकशी चालविली असून काहीजणांविरुद्ध गुन्हेही नोंद केले आहेत.
कोणत्या खाण कंपनीने कर चुकविला किंवा चुकविला नाही, ते अजून स्पष्ट झालेले नाही. तथापि, सीमाशुल्क खात्याच्या मुख्य आयुक्तांच्या सहकार्याने केंद्रीय रेव्हेन्यू इंटेलिजन्स संचालनालयाने सीमाशुल्क (कस्टम) कायद्यातील तरतुदींखाली सहा कंपन्यांची चौकशी चालविली आहे. डीआरआयच्या मुंबई क्षेत्राच्या कार्यालयाने साळगावकर ग्रुप आॅफ कंपनीचीही चौकशी चालविली आहे. हे चौकशी काम आता पूर्ण झाले की नाही ते कळू शकले नाही; पण तपासादरम्यान साळगावकर ग्रुप आॅफ कंपनीने पन्नास कोटींची रक्कमही जमा केली आहे. त्याशिवाय मेसर्स फोमेन्तो ग्रुप आॅफ कंपनी, मेसर्स मॅग्नम मिनरल्स अशा काही कंपन्यांचीही डीआरआयने चौकशी चालविली आहे.
आॅगस्ट २०१३ मध्येच अलर्ट
गोव्यातील खाण कंपन्यांचे व्यवहार आणि करचुकवेगिरीची व महसूलहानीची शक्यता लक्षात घेऊन रेव्हेन्यू इंटेलिजन्स संचालनालयाने (डीआरआय) ८ आॅगस्ट २०१३ रोजीच अलर्ट जारी केला होता. तसे दाखवून देणारी कागदपत्रे ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहेत. केंद्र सरकारच्या महसुलाचे रक्षण करण्यासाठी हा अलर्ट जारी करण्यात आला होता, असे डीआरआयचे म्हणणे आहे. मनी लाँडरिंग प्रकरणीही काही कंपन्यांची चौकशी केंद्र सरकारचे अंमलबजावणी संचालनालय करत असून त्याबाबत यापूर्वी एफआयआरही नोंद झाला आहे. येत्या दि. १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी संचालनालय काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंद करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
राधा तिंबलो यांच्या कंपनीचे नाव सध्या देशभर चर्चेत आहे. त्यांच्या कंपनीचे स्वीस बँकेत बेकायदा बँक खाते असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळविल्याने तिंबलो कंपनी चर्चेत आली. तिंबलो कंपनीच्या अन्य संचालकांची नावेही केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहेत. तिंबलो कंपनीचे नाव बाहेर येण्यापूर्वीपासून म्हणजे गेल्या एक वर्षापासून करचुकवेगिरीप्रकरणी गोव्यातील काही कंपन्या डीआरआय, सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सीस, सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साईज अ‍ॅण्ड कस्टम्स अशा काही यंत्रणांच्या रडारवर आहेत. (खास प्रतिनिधी)

Web Title: Sesamira after the taxbudva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.