कुळ, मुंडकारांच्या खटल्यांसाठी जलद गती न्यायालय स्थापन करा; जीत आरोलकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By किशोर कुबल | Published: November 1, 2023 03:00 PM2023-11-01T15:00:22+5:302023-11-01T15:01:26+5:30
पणजी : कुळ, मुंडकारांचे खटले विनाविलंब निकालात काढले जावेत, या मागणीसाठी आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ...
पणजी : कुळ, मुंडकारांचे खटले विनाविलंब निकालात काढले जावेत, या मागणीसाठी आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना यावर सहानुभूतीपूर्वक विचार करु, असे आश्वासन दिले आहे.
निवेदनात आरोलकर यांनी कुळ, मुंडकार खटले निकालात काढण्यासाठी जलद गती न्यायालय स्थापन करून एक स्वतंत्र मामलेदार याच कामासाठी नियुक्त करावा, अशी मागणी केली आहे.
निवेदन सादर केल्यानंतर लोकमतशी बोलताना आरोलकर म्हणाले की, पन्नास वर्षे उलटली तरी कुळ, मुंडकारांना न्याय मिळालेला नाही. पेडणे मतदारसंघात मोपा विमानतळ झाल्यापासून मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येत आहेत. अनेक भाटकारांनी मुंडकारांना कल्पना न देताच घरे विकलेली आहे. त्यामुळे मुंडकार वाऱ्यावर पडले आहेत. कुळ जाहीर करण्यासाठी पेडण्यातच २८४ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याशिवाय असंख्य अर्ज पडून आहेत. गरीब कुळ मुंडकारांवर अन्याय होत आहे.
आरोलकर म्हणाले की,' मुख्यमंत्र्यांनी माझे म्हणणे गंभीरपणे ऐकून घेतले असून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. जलद गती न्यायालय किंवा लवाद स्थापन करण्यासाठी मी आग्रही आहे.'