गोव्याबाहेरील मासळीच्या तपासणीसाठी आंतरराष्ट्रीय एजन्सी नेमणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 05:31 PM2018-10-08T17:31:15+5:302018-10-08T19:14:47+5:30
विश्वजीत राणे : 48 तासात अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच
मडगाव : गोव्यात आयात केल्या जाणाऱ्या मासळीत फॉर्मेलिन सापडत असल्याचा आरोप होत असतानाच बाहेरुन येणाऱ्या मासळीची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन प्राधिकरण आंतरराष्ट्रीय एजन्सीची नियुक्ती करणार अशी माहिती या खात्याचे मंत्री विश्र्वजीत राणे यांनी दिली. येत्या 48 तासात या संबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असे सूतोवाचही त्यांनी केले. येत्या 24 तासात यासंदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोव्यात आयात होणाऱ्या मासळी संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, मच्छीमार मंत्री विनोद पालयेकर, मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा, एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई, पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राणो म्हणाले, माशांच्या आयातीसंदर्भात विरोधक जे आरोप करतात त्यात कसलेही तथ्य नसून त्यांच्याकडून केवळ जोकरगिरी चालू आहे. मात्र त्यामुळे लोकांची दिशाभूल होऊ लागली आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही भारत सरकारची मान्यता असलेल्या आंतरराष्ट्रीय एजन्सीची या तपासणीसाठी मदत घेऊ. गोव्यात पोळे व पत्रादेवी या दोन सीमांवरुन परराज्यातून मासे घेऊन येणारी वाहने आत शिरतात. या दोन्ही चेक नाक्यांवर वाहनांची तपासणी करण्याची तजवीज आम्ही करु. त्याशिवाय दसऱ्यानंतर मडगावच्या होलसेल व रिटेल मासळी मार्केटात एफडीएची पथके कायमस्वरुपी तैनात करु असे त्यांनी सांगितले.
आणखी एक घोटाळा
आयात मासळीतील फॉर्मेलिन तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सी नेमणे हा आणखी एक घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी मासळी आयातीवर बंदी आणा, या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, ‘बंदी आणली तरच गोमंतकीयांमध्ये आपण जी मासळी खातो ती स्थानिक मासळी आहे आणि सुरक्षित आहे याबद्दल विश्वास निर्माण होईल.’ हे सरकार गोवेकरांच्या सुरक्षेसाठी नव्हे तर मासळी माफियांसाठी वावरत आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.