नव्या कायद्याच्या माध्यमातूनच गोव्यातील खाणबंदीवर तोडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 07:39 PM2019-01-16T19:39:46+5:302019-01-16T19:39:54+5:30
खाणी बंद झाल्यामुळे गोव्यात जी समस्या निर्माण झाली आहे, त्यावर संसदेत कायदा करून उपाययोजना केली जाईल, अशी माहिती दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी दिली.
मडगाव: खाणी बंद झाल्यामुळे गोव्यात जी समस्या निर्माण झाली आहे, त्यावर संसदेत कायदा करून उपाययोजना केली जाईल, अशी माहिती दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी दिली. हल्लीच खनिज अवलंबितांनी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. या समस्येवर तोडगा काढण्याचा विश्वास पक्षाला आहे, असे ते म्हणाले.
मडगावात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना पत्रकारांशी बोलताना सावईकर यांनी ही शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने असे कित्येक निवाडे दिले आहेत ते लक्षात घेता असा कायदा करणे शक्य आहे, असे वाटते. खाण अवलंबितांच्या या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन शहा यांनी दिले होते. या समस्येवर यशस्वी तोडगा काढला जाईल असे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून मागच्या वर्षी गोव्यातील 88 खाणी बंद केल्या होत्या. त्यानंतर हा उद्योग थंड पडला. हा उद्योग पुन्हा सुरू करावा यासाठी खाण अवलंबितांनी आंदोलन सुरू केले आहे, यासाठी नवी दिल्लीच्या जंतर मंतरवर त्यांनी धरणेही धरले होते.