मासळी प्रश्नावर तोडगा काढा अन्यथा मार्केट बंद पाडू, म्हापसा विक्रेत्यांची संघटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 01:12 PM2018-11-08T13:12:49+5:302018-11-08T13:17:58+5:30
मासळीच्या आयातीवर लागू केलेल्या बंदीचा, आरोग्य मंत्र्याचा म्हापशातील मासळी विक्रेत्या संघटनेने निषेध करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
म्हापसा - मासळीच्या आयातीवर लागू केलेल्या बंदीचा, आरोग्य मंत्र्याचा म्हापशातील मासळी विक्रेत्या संघटनेने निषेध करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुढील १५ दिवसात आयातीच्या प्रश्नावर तोडगा न काढल्यास मार्केट बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
मासळीच्या आयातीवर लागू केलेल्या बंदीचा निषेध करण्यासाठी म्हापशातील मासळी विक्रेत्या संघटनेने गुरुवारी सकाळी मार्केटमध्ये निदर्शने केली. यावेळी १०० हून जास्त मासळी विक्रेत्या उपस्थित होत्या. म्हापशात मासळी विक्रेत्यांच्या संघटनेत सुमारे हजाराहून जास्त सदस्य नोंद झाले आहेत. निदर्शनात आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचा निषेध करण्यात आला. मासळीच्या प्रश्नावर राणे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे असंख्य विक्रेत्यांच्या पोटावर त्यांनी घाला घातला असल्याचा आरोप संघटनेच्या अध्यक्षा शशिकला गोवेकर यांनी केला. लोकांनी चांगली मासळी सुद्धा विकत घेणे बंद केले असल्याने त्याचे विपरीत परिणाम सर्वांना भोगावे लागत असल्याचे यावेळी सांगितले. सरकारला जर मासळीत फॉर्मेलिन असल्याचा संशय असल्यास त्यांनी मासळीच्या दर्जाची छाननी जरुर करावी. त्यासाठी मडगावात तसेच म्हापशात तपासणीसाठी कार्यालय थाटण्याची मागणी केली पण आयातीवर बंदी लागू करु नये असेही मत व्यक्त केले.
मासळी विक्रेत्यांवर टिका करणारे आमदार तथा माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांच्यावर सुद्धा संघटनेनी टिका केली. दुसऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या आलेमाव हे स्वत:पुरता विचार करतात असेही त्या म्हणाल्या. विक्रेत्यांना कारागृहात बंद करण्याची मागणी करणाऱ्या आलेमाव यांना कोलवाळ येथील कारागृत स्वत: बसण्याची पाळी आली होते याचा त्यांना विसर पडला असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात दिवसा किमान ३० वाहने मासळी घेवून येतात. त्यातील बहुतांश मडगावला तर काही म्हापशात असतात. या मासळीच्या दर्जासंबंधी संशय असल्यास त्याची जरुर तपासणी करावी अशीही मागणी गोवेकर यांनी यावेळी केली. येणाºया या मासळीमुळे इथल्या लोकांची गरज भागवली जाते अशीही माहिती यावेळी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सध्या आजारी आहेत. त्यांच्या गैरहजेरीत मासळीच्या प्रश्नावरुन काही लोकांकडून ताणला गेला जात असून त्यांची तब्बेत व्यवस्थित असती तर सध्याचा वाद उद्भवलाच नसता असेही गोवेकर म्हणाल्या; पण वारंवार पक्ष बदलणाऱ्या राजकारण्यांकडून मासळीचा प्रश्न ताणला जात असल्याचे केलेल्या आरोपात यावेळी सांगितले.