गोव्याच्या समुद्रात 15 दिवसात सहाजणांचा बुडून मृत्यू; शासकीय यंत्रणेसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 02:56 PM2017-09-07T14:56:15+5:302017-09-07T14:58:44+5:30
गोव्याच्या समुद्रात गेल्या पंधरा दिवसांत एकूण सहाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
पणजी, दि. 7 - गोव्याच्या समुद्रात गेल्या पंधरा दिवसांत एकूण सहाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या महिन्यात सुरू होत असतानाच समुद्रात बुडून मृत्यू पावणार्या पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने पर्यटन आणि पोलिस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
गोव्याला वार्षिक सरासरी 60 लाख पर्यटक भेट देतात. यात बहुतांश देशी पर्यटकांचा समावेश असतो आणि समुद्रात बुडून मृत्यू होणारेही बहुतांश देशी पर्यटकच आढळून येत आहेत. अहमदाबाद गुजरात येथील एका शैक्षणिक संस्थेच्या दोघा विद्यार्थी मुलींचा गुरुवारी 7 रोजी उत्तर गोव्यातील कांदोळी समुद्रात बुडून मृत्यू झाला.
तीन दिवसांपूर्वी नैनितालमधील पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. कांदोळी व कळंगुटच्या पट्ट्यातील समुद्रात गेल्या आठवडाभरातच चौघा पर्यटकांना जलसमाधी मिळाली. तत्पूर्वी दोनापावल येथील समुद्रात होडी उलटून दोघे मच्छिमार बुडाले.
गोव्याच्या सागरकिनारी सुमारे चारशे जीवरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तरीही पर्यटक बुडण्याच्या घटना घडत आहेत. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांच्या मते काहीवेळा पोलिसांच्या व जीवरक्षकांच्याही सूचना धुडकावून अवेळी पर्यटक समुद्र स्नानासाठी जातात व दुर्घटना घडतात. गुरूवारच्या दुर्घटनेमागिल पार्श्वभूमी मात्र कळू शकली नाही.