विधानसभेत 'राडा'; सात आमदार निलंबित, मणिपूर वादाचे पडसाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:41 AM2023-08-01T09:41:03+5:302023-08-01T09:43:02+5:30

जीत आरोलकर यांना धक्काबुक्की

seven mla suspended in goa assembly monsoon session 2023 | विधानसभेत 'राडा'; सात आमदार निलंबित, मणिपूर वादाचे पडसाद 

विधानसभेत 'राडा'; सात आमदार निलंबित, मणिपूर वादाचे पडसाद 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून करण्यात आलेली चर्चेची मागणी सभापतींनी मंजूर न केल्यामुळे विरोधकांनी काल विधानसभेत अक्षरश: राडा घातला. यावेळी शून्य तासात बोलणाऱ्या जीत आरोलकर यांना अडथळे आणून त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्यामुळे युरी आलेमाव, वीरेश बोरकर, वेन्झी व्हिएगश, क्रूज सिल्वा, विजय सरदेसाई, कार्लस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्टा या सातही विरोधी आमदारांना सोमवार, मंगळवार असे दोन दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, संध्याकाळी सभापतींनी यामध्ये शिथिलता आणत आज, मंगळवारी दुपारी १२:३० नंतर हे सातही आमदार विधानसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, असे म्हटले आहे. मणिपूर घटनेचा निषेध करणारा खासगी ठराव दाखल करून न घेतल्यामुळे शून्य तासाचे कामकाज रोखून धरण्याच्या प्रयत्नात विरोधकांचा संयम सुटला. सभागृहात येतानाच विरोधी हंगामा करण्याच्या उद्देशाने आल्याचे दिसले. सर्व विरोधी आमदारांनी काळा वेश परिधान केला होता. 

यावेळी सभापतींच्या आसनासमोर जाऊन घोषणा देणाऱ्या विरोधी आमदारांना न जुमानता सभापतींनी कामकाज चालू ठेवल्यामुळे निदर्शक आणखीच भडकले. त्यामुळे त्यांनी शून्य तासात बोलणारे मगोचे आमदार जीत आरोलकर यांच्याकडे मोर्चा वळविला आणि त्यांना बोलताना अडथळा आणला. यावेळी विजय सरदेसाई यांनी त्यांचा माईक काढून घेत त्यांचा अपमान केला. दरम्यान, या प्रकरणात शुक्रवारी चर्चा करता येईल, असे आश्वासन सभापतींनी विरोधकांना दिले होते. परंतु विरोधक आताच चर्चा व्हावी, या मागणीवर ठाम राहिले. सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी कारवाईबद्दल सभापतीचे आभार मानले. ते म्हणाले, सभागृहात आमदाराला धक्काबुक्की करणे योग्य नव्हे.

आमदारांना घातली मार्शलची टोपी

सभापतींच्या आसनासमोर जाऊन निदर्शने करणे ही नवीन गोष्ट नाही. परंतु एखाद्या आमदाराला सभागृहात बोलताना घेरून अडथळा आणत त्यांचा माईक काढून घेण्याची घटना पहिल्यांदाच घडली. त्याही पुढे जाऊन आमदार जीत आरोलकर यांच्याकडील टिपण्णी असलेले पेपर हिंसकावून ते फेकून दिले. एवढ्यावरच न थांबता विरोधी आमदारांनी आरोलकरांना धक्काबुक्कीही केली.

हा तर सभागृहाचा अवमान : मुख्यमंत्री

विरोधकांच्या या वर्तनाचा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही तीव्र निषेध केला आणि आक्षेप घेताना त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली. असा प्रकार आजपर्यंत या सभागृहात कधीच घडला नव्हता, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. विरोधकांनी केवळ आमदाराचा नव्हे तर सभापतींचा आणि सभागृहाचाही अवमान केल्याचे सांगितले आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केली.

दुर्देवी घटना : सभापती

सभापती रमेश तवडकर म्हणाले, हा अत्यंत दुर्देवी आहे. सातही विरोधी आमदारांनी केलेले वर्तन अशोभनीय आहे. निलंबित आमदारांपैकी काही ज्येष्ठ विधिमंडळ सदस्यांनी तसेच सत्ताधाऱ्यांपैकीही काही ज्येष्ठ आमदारांनी आपली भेट घेतली आणि या विषयावर चर्चा केली. त्यानंतर निलंबन शिथिल करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.

गॅलरीतील काँग्रेसवालेही उठले

सभागृहात हा प्रकार चालू असतानाच प्रेक्षक गॅलरीतही काही लोक उठून उभे राहिल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. उभी राहिलेल्या मंडळीत महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नईक व इतर लोक होते. सभापतींनी त्यांना बसण्याची सूचना केल्यावर ते लोक खाली बसले.

Web Title: seven mla suspended in goa assembly monsoon session 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.