गोव्यात अडकलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना मायदेशी नेण्यासाठी येणार सात खास विमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 08:35 PM2020-03-30T20:35:51+5:302020-03-30T20:36:15+5:30
वास्को: लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकून राहीलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. पुढच्या ...
वास्को: लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकून राहीलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. पुढच्या पाच दिवसात दाबोळी विमानतळावर विविध देशातून सात खास विमाने या पर्यटकांना नेण्यासाठी गोव्यात येणार आहेत. लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकून राहीलेल्या ३९९ विदेशी पर्यटकांना यापूर्वी दाबोळी विमानतळावरून खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूची पसरण रोखण्यासाठी संपूर्ण भारतात २१ दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. याचे पालन गोव्यात सुद्धा कडक रित्या करण्यात येत असून यामुळे दाबोळी विमानतळावर राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय विमानसेवा सद्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचा परिणाम गोव्यात असलेल्या विदेशी पर्यटकांवर पडलेला असून त्यांना सद्या मायदेशी जाणे कठीण झालेले आहे. सदर पर्यटकांना मायदेशी पाठवण्यासाठी विविध हालचाली चालू करण्यात आलेल्या असून लवकरच त्यांना त्यांच्या राष्ट्रात पाठवण्यात येणार असल्याचे दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी सांगितले.
लॉकडाऊन झाल्यानंतर गोव्यात अडकून राहीलेल्या ३९९ विदेशी पर्यटकांना अजून पर्यंत खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे. यात २४९ युनायटेड किंगडम, १२१ रशिया व २९ चेक प्रजासत्ताक चे नागरिक असल्याची माहीती गगन मलिक यांनी दिली. गोव्यात अजून आणखीन २००० विदेशी पर्यटक अडकून असल्याची माहीती मलिक यांनी देऊन येणाऱ्या चार ते पाच दिवसात त्यांना सुद्धा त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. गोव्यात अडकून राहीलेल्या या विदेशी पर्यटकात फ्रेंकफट (जर्मनी), फिनलँड, इस्त्राईल, रशिया व वॉरसॉ (पोलंड) या राष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याची माहीती संचालक गगन मलिक यांनी दिली.
लॉकडाऊन मुळे अडकून राहीलेल्या विदेशी पर्यटकांना नेण्यासाठी चार ते पाच दिवसात दाबोळी विमानतळावर सात खास विमाने येणार असून ती त्यांना घेऊन त्यांच्या मायदेशी जाणार आहेत. या दोन हजार विदेशी पर्यटकांव्यतिरिक्त गोव्यात आणखीन विदेशी पर्यटक अडकून राहीलेले आहेत काय याची चौकशी चालू असून असे असल्यास त्यांना सुद्धा येथून नेण्यासाठी येणाºया काळात उचित पावले उचलण्यात येणार असल्याचा विश्वास गगन मलिक यांनी पुढे व्यक्त केला. या पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येत असताना कोरोना विषाणूची पसरण होऊ नये यासाठी विविध प्रकारची खबरदारी बाळगण्यात येत आहे. प्रवाशी विमानातून जाताना सामाजिक अंतर (सोशल डीस्टंन्सीग) व इतर विविध प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीने दाबोळी विमानतळावर पावले उचलण्यात येत असल्याचे मलिक यांनी माहीतीत शेवटी सांगितले.