गोवा : मंदिरातील विनयभंग प्रकरणामुळे धार्मिकस्थळे महिला आयोगाच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:33 PM2018-08-22T14:33:53+5:302018-08-22T14:37:18+5:30
गोव्यातील मंगेशी गावच्या श्री मंगेश या अत्यंत प्रसिद्ध मंदिरातील पुजा-याने विनयभंग करण्याची घटना घडल्यानंतर गोव्याचे सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे.
पणजी : गोव्यातील मंगेशी गावच्या श्री मंगेश या अत्यंत प्रसिद्ध मंदिरातील पुजा-याने विनयभंग करण्याची घटना घडल्यानंतर गोव्याचे सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे. लोकांमध्ये पुजा-याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. देवस्थान समिती प्रारंभी या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात अपयशी ठरल्याने आता गोवा महिला आयोगाला मंदिरे, मशिद, चर्च अशा धार्मिकस्थळांविषयी व्यापक भूमिका घ्यावी लागली आहे. मंदिरांमध्ये व अन्य धार्मिकस्थळांच्या ठिकाणी लैंगिक शोषणविरोधी समित्या स्थापन केल्या जायला हव्यात अशी शिफारस महिला आयोगाने केली आहे.
गोव्यातील सर्व धार्मिक स्थळांना महिला आयोगाने पत्र लिहिले आहे व लैंगिक शोषणविरोधी समित्या नेमण्याची शिफारस केली आहे. येत्या 30 सप्टेंबर्पयत अशा समित्या स्थापन करण्यासाठी आयोगाने मंदिरे, चर्चेस व मशिदींना वेळ दिला आहे. समित्यांवर महिलांच्या नियुक्त्या केल्या जाव्यात असे अपेक्षित आहे. देवस्थान समित्या व अन्य धार्मिक स्थळांकडे जर आवश्यक संख्येने महिला नियुक्त करण्यासाठी नसल्या तर त्यांनी अन्य महिलांची नियुक्ती करता येते. मात्र मंदिरे, चर्च व मशिदींमध्ये हजारो लोक जात असल्याने अशा ठिकाणी अंतर्गत लैंगिक शोषण समित्या असायला हव्यात. समित्या असल्या तरच तक्रारींसाठी कुणी त्या समित्यांकडे जाऊ शकेल. मंगेशी येथील मंदिराकडे अशा प्रकारची समिती नव्हती. दोघा तरुणींना विनयभंगाचा भयानक अनुभव आल्यानंतर त्यांना तक्रार करण्यासाठी प्रारंभी वाव मिळाला नाही. नंतर तक्रार आली तेव्हा देवस्थान समितीने वरवरची चौकशी केली पण प्रकरण योग्य त्या तपास यंत्रणोकडे पाठविण्यात समितीला अपयश आले. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या गोवा महिला आयोगाला मंदिरे, मशिदी व चर्चेसमध्ये लैंगिक शोषणविरोधी समित्या असाव्यात म्हणून सक्रिय व्हावे लागले आहे.
कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणविरोधी 2013 सालच्या कायद्यात दुरुस्त्या व्हायला हव्यात म्हणूनही महिला आयोग प्रयत्न करणार आहे. सर्व मंदिरे, चर्चेस व मशिदी या कायद्याच्या कक्षेत यायला हव्यात अशी भूमिका आयोगाने घेतली आहे व या भूमिकेचे समाजातून स्वागतही होत आहे. दरम्यान, विनयभंगाची तक्रार पोलिसांत आल्यानंतर गेले अनेक दिवस गायब असलेला धनंजय भावे हा 51 वर्षीय पुजारी अखेर न्यायालयास शरण आला. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.