शॅक व्यावसायिकांची लगबग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 10:26 AM2018-09-25T10:26:32+5:302018-09-25T10:28:42+5:30
पुढील महिन्यापासून सुरू होणा-या पर्यटन हंगामाची तयारी जोरात सुरुवात झाली आहे. कळंगुट किनारपट्टीवरील शॅकची आखणी करण्याचे काम पर्यटन खात्याकडून पूर्ण करण्यात आले असून या परिसरात कांदोळी ते सिकेरीपर्यंत १९४ शॅक उभारले जाणार आहेत.
म्हापसा - पुढील महिन्यापासून सुरू होणा-या पर्यटन हंगामाची तयारी जोरात सुरुवात झाली आहे. कळंगुट किनारपट्टीवरील शॅकची आखणी करण्याचे काम पर्यटन खात्याकडून पूर्ण करण्यात आले असून या परिसरात कांदोळी ते सिकेरीपर्यंत १९४ शॅक उभारले जाणार आहेत. काही व्यावसायिकांनी शॅक घालण्याचे कामही सुरु केले असून १ आॅक्टोबरपासून आपला व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. येणा-या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असलेल्या जलक्रीडा खेळांनासुद्धा मागील काही दिवसापासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामा हळुहळू आकार घ्यायला लागला आहे. या वर्षी पर्यटन खात्याने कळंगुट ते बागापर्यंतच्या परिसरात १०५ शॅक्सना तर कांदोळी ते सिकेरीपर्यंत भागात ८८ शॅक्सना मान्यता दिली आहे.
दोन शॅकमध्ये ५ मीटरांचे अंतरही ठेवले जाणार आहे. त्याचा फायदा लोकांना किना-यावर फिरताना होणार आहे. तसेच आपात्कालीन वेळेला वाहन सुद्धा किना-यावर आणणे सोयीस्कर ठरणार आहे. गेल्या वर्षी हे अंतर ३ मीटरचे होते. व्यावसायिकांना देण्यात आलेले परवाने तीन वर्षासाठीचे होते. त्यामुळे हा परवान्यांची मुदत या वर्षीचा हंगामा संपल्यानंतर संपुष्टात येणार आहे. पुढील वर्षी परवान्याची प्रक्रीया नव्याने सुरु केली जाणार आहे.
केरळात आलेल्या पुरानंतर तेथील परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आली नसल्याने गोव्यात येणा-या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शॅक मालक कल्याण संघटनेने महासचिव जॉन लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा हंगामा चांगला होण्याची संभावना त्यांनी व्यक्त केली. केरळला जाणारे पर्यटक गोव्यात येण्याची शक्यता असल्याने त्याचा फायदा इथल्या व्यवसायिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलक्रीडा व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य परवाने देण्यात आल्याची माहिती व्यावसायिकाने दिली.
कळंगुट पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार हंगामा सुरु होण्यापूर्वी पंचायतीच्या वतीने संबंधीतांची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत शॅक व्यावसायिक, पर्यटन पोलीस, कचरा कंत्राटदार, तसेच जलक्रीडा व्यावसायिकांचा त्यात समावेश राहणार असल्याचे सांगितले. व्यवसाय सुरू होण्यापूर्वी हाती घेण्याच्या उपाय योजनेवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कांदोळीचे सरपंच ब्लेज मिनेझीस यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या हंगामात किनारपट्टी स्वच्छ राहणार याची दक्षता बाळगली जाणार आहे. त्यासाठी पंचायतीच्या वतीने योग्य पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले.