मडगावातील सोनसड्यावर आता सुक्या कचऱ्याचा नवीन डोंगर, शॅडो कौन्सिलकडून चिंता व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 04:56 PM2019-11-01T16:56:36+5:302019-11-01T16:57:12+5:30
मडगावातील कचऱ्यावर प्रभावी तोडगा काढण्यास अपयश आलेल्या मडगाव पालिकेसमोर आता बेलिंग न केलेल्या सुक्या कचऱ्याचे काय करावे हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.
मडगाव - मडगावातील कचऱ्यावर प्रभावी तोडगा काढण्यास अपयश आलेल्या मडगाव पालिकेसमोर आता बेलिंग न केलेल्या सुक्या कचऱ्याचे काय करावे हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. बेलिंग न करता सोनसड्यावर जमा करून ठेवलेल्या या सुक्या कचऱ्याचाही आता डोंगर बनला असून, त्यामुळे एक नवा सोनसडा तर तयार होणार नाही ना अशी भीती नागरिकांना सतावू लागली आहे.
यापूर्वी मडगाव पालिका ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास पूर्णपणो अपयशी ठरल्याने न्यायालयाकडूनही या पालिकेला कानपिचक्या देण्यात आल्या होत्या. प्रक्रिया न केलेला कचरा सोनसड्यावर टाकला जात असल्याने तेथे कचऱ्याचा डोंगर वाढला होता त्यामुळे हा डोंगर जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत या जागेत नवीन कचरा टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णपणो बंदी घातल्यानंतर शहरातून गोळा केला जाणाऱ्या सुक्या कचऱ्याचे करावे काय हा नवीन प्रश्न पालिकेसमोर उभा झाला होता. सध्या मडगाव पालिका सुका कचरा थैल्यात बांधून सोनसडय़ावर टाकू लागली आहे. दर दिवशी सुमारे 1400 थैल्या या जागेत साठवून ठेवल्या जातात.
शॅडो कौन्सिलच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सोनसड्याला भेट दिली असता या सुक्या कचऱ्याचा डोंगर दिसून आला. मडगावात दर दिवशी सुमारे 15 टन सुका कचरा गोळा केला जातो. मात्र त्यापैकी दरदिवशी केवळ चार टन कचऱ्याचेच बेलिंग केले जाते. त्यामुळेच हा भल्या मोठय़ा प्रमाणात सुका कचरा साठून राहिला आहे. सध्या सोनसड्यावर साठून राहिलेला एकूण सुका कचरा दीड हजार टनापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात बोलताना शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो म्हणाले, मडगाव पालिकेकडे फक्त दोन कचरा बेलिंग मशिन असून एका मशिनवर 300 किलो कचऱ्याचे बेलिंग करता येणो शक्य आहे. त्यामुळे दरदिवशी सरासरी चार टन कच:याचेच बेलिंग होते. इतर कचरा तसाच पडून रहातो असे ते म्हणाले.
या कचऱ्यावर जर आताच उपाययोजना केली नाही तर या सुक्या कचऱ्याचाही सोनसड्यावर आणखी एक मोठा डोंगर होणार आहे आणि भविष्यात तो धोकादायक ठरू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मडगाव पालिका या बाबतीत अजूनही सुस्त आहे ही एकदम शोचनीय बाब असल्याचे ते म्हणाले.