इफ्फीच्या उद्घाटनाला शाहरुख खान तर समारोपाला बच्चन कुटुंबीय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 02:20 PM2017-11-14T14:20:33+5:302017-11-14T14:21:21+5:30
येत्या आठवड्यात सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान तर समारोप सोहळ्याला संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.
पणजी : येत्या आठवड्यात सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान तर समारोप सोहळ्याला संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. आयोजकांनी त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सध्या चालविले आहेत. 48व्या चित्रपट महोत्सवाचे येत्या सोमवारी ( 20 नोव्हेंबर )उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळा पणजीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दोनापावल- बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात पार पडेल. शाहरुख खान या उद्घाटन सोहळ्य़ाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहावा, असा आयोजकांचा प्रयत्न आहे. 'बियॉण्ड द क्लाऊड्स' हा इफ्फीचा उद्घाटनाचा चित्रपट असेल.
इराणी चित्रपट निर्माते माजिद माजिदी यांचा हा सिनेमा असून या सिनेमामधून मुंबईतील एका कुटुंबातील भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर प्रकाश टाकला गेला आहे. ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस या चित्रपटाचा प्रीमियर इफ्फीमध्ये मंगळवारी (21 नोव्हेंबर) होणार आहे. सिनेमा ऑफ द वर्ल्ड या विभागात हा चित्रपट दाखविला जाईल. 28 नोव्हेंबरला इफ्फीचा समारोप सोहळा होईल. बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासहीत त्यांचे कुटुंब इफ्फीच्या समारोप सोहळ्यात सहभागी व्हावे, असा आयोजकांचा प्रयत्न आहे, असे गोवा मनोरंजन संस्थेच्या अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, राजधानी पणजीत सध्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पूर्ण वातावरण तयार झाले आहे. पणजी नगरी इफ्फीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. कला अकादमी ते आयनॉक्स मल्टीप्लेक्स ते जुनी गोमेकॉ इमारत या पूर्ण पट्टय़ात इफ्फीविषयक कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी इफ्फीविषयक प्रत्येक कामामध्ये रस घेतला आहे. प्रत्येक मोठ्या कामाची किंवा उपक्रमाची फाईल त्यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवली जात आहे. सोहळा यशस्वी व्हावा म्हणून चित्रपटसृष्टीतील सुमारे शंभर कलाकार श्रीमती इराणी यांच्याकडून गोव्यात पाठवून दिले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
इफ्फीच्या तयारीबाबत गोवा यावेळी थोडा मागे राहिल्यासारखा दिसतो, असे जाणकारांचे मत आहे. डागडुजी, रंगरंगोटी, बांदोडकर रस्त्याच्या बाजूने टाईल्स बदलणो, छोटी बांधकामे करणो अशी कामे अजून सुरू आहेत. इफ्फीच्या उद्घाटनाचा दिवस अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. यंदाच्या इफ्फी प्रतिनिधींना कॅटलॉग उपलब्ध होऊ शकणार नाहीत. कारण छपाईसाठी वेळ कमी असल्याचे सांगण्यात आले. त्याऐवजी प्रतिनिधींसाठी एक अॅप सुरू केले जाणार आहे.