शापोरा, बेतूल प्रकल्प लादलेले नाहीत!
By admin | Published: June 15, 2016 01:40 AM2016-06-15T01:40:40+5:302016-06-15T01:43:57+5:30
पणजी : शापोरा येथील नदीचा पर्यटनासाठी वापर करणे आणि दक्षिण गोव्यातील बेतूल येथे सॅटेलाईट बंदर उभारणे हे प्रकल्प
पणजी : शापोरा येथील नदीचा पर्यटनासाठी वापर करणे आणि दक्षिण गोव्यातील बेतूल येथे सॅटेलाईट बंदर उभारणे हे प्रकल्प सरकारने लोकांवर लादलेले नाहीत. केवळ चर्चेसाठी लोकांसमोर खुले केले आहेत, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, शापोरा येथील नदीचा वापर पर्यटनासाठी व्हावा व त्यातून रोजगार
संधी आणि नोकऱ्या तयार व्हाव्यात, ही कल्पना माझी आहे. तथापि, मी ती लोकांवर लादलेली नाही. अगोदर पंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य यांना बोलावून आपण त्यांच्यासमोर शापोरा प्रकल्पाचा विषय मांडला. प्रत्येकास तो आवडला. त्यानंतर सर्व संबंधित पंचायत क्षेत्रातील लोकांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण व्हावे असे ठरले. तथापि, काहीजण
या प्रकल्पाच्या मार्गात मुद्दाम अडथळे निर्माण
करू पाहत आहेत व त्यासाठी आमच्या
पंचायत क्षेत्रात प्रकल्पाचे सादरीकरण देखील नको, अशी हुकूमशाही पद्धतीची भूमिका
मोजके लोक घेत आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ येत असल्याने त्या परिसरात आणखी पर्यटनस्थळे तयार व्हावीत, असा माझा प्रयत्न
आहे. पेडणे तालुक्यात आणखी दोन-तीन पंचतारांकित हॉटेल्स उभी राहावीत, असेही
मला वाटते. शापोरा प्रकल्प काय आहे ते राजकारण्यांनी व लोकांनी निदान एकदा पाहून तरी घ्यावे व मग निर्णय घ्यावा.
मुख्यमंत्री म्हणाले की, बेतूल येथील बंदराच्या विषयाबाबत मी संवेदनशील आहे. केंद्र सरकारला मी त्यासाठी मान्यता दिलेली नाही. लोकांनी त्याविषयी अगोदर चर्चा करूद्या.
(खास प्रतिनिधी)