भाजपा-सेना युती होऊ नये हाच हेतू - शरद पवार
By admin | Published: January 30, 2017 01:39 PM2017-01-30T13:39:20+5:302017-01-30T14:13:58+5:30
महाराष्ट्रात भाजपाला समर्थन देण्यासंबंधी केलेले विधान हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊ नयेत, यासाठी खेळलेली रणनीती असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गोव्यात केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 30 - महाराष्ट्रात भाजपाला समर्थन देण्यासंबंधी केलेले विधान हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊ नयेत, यासाठी खेळलेली रणनीती असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गोव्यात केला आहे. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर भाजपाच्या विरोधात आपले आमदार राहतील, असे विधान पवार यांनी केले. यानंतर त्यांना महाराष्ट्रात भाजपाला सर्थन देण्याचे त्यांचे विधान तत्त्वांशी विसंगत नव्हे काय? असा प्रश्न करण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की 'महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा किंवा शिवसेनेशी युती केलेली नाही.
गेली अनेक वर्षे एकत्र निवडणूक लढलेले भाजपा आणि शिवसेना या पक्षांची युती महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुटली आहे. हे पक्ष पुन्हा एकत्र होऊ नये, यासाठी रणनीतीचा भाग म्हणून भाजपाच्या समर्थनासंबंधी वक्तव्य आपण केले होते. त्यात या पक्षाशी खरोखरच युती करण्याची तयारीही नव्हती आणि इच्छाही नव्हती, असा गौप्यस्फोट पवारांनी केला.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं युतीसाठी प्रतिसाद दिला नाही. राष्ट्रवादीला अत्यल्प जागा देण्याच्या पक्षात काँग्रेस होती. येत्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची शक्ती त्यांना कळणार असल्याचेही पवार म्हणाले. गोव्यात एकला चलो करणाऱ्या राष्ट्रवादीकडून 40 पैकी 17 मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
गोव्यात खनिज उद्योगावर पसरलेली अवकळा आणि त्यामुळे झालेली बेरोजगारी याला संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हेच जबाबदार आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. दिल्ली येथील काही पर्यावरणवादी संघटना या गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सांगणे ऐकत होत्या, असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.