अनियंत्रित मासेमारी रोखण्यासाठी पाळत ठेवून डेटा सामायिक करा - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
By किशोर कुबल | Published: October 30, 2023 07:25 PM2023-10-30T19:25:16+5:302023-10-30T19:25:35+5:30
चांचेगिरी, दहशतवाद, ड्रग्स तस्करींचा सामना करण्यासाठी बहुराष्ट्रीय सहयोग चौकट हवी.
पणजी : अवैध तसेच विनापरवाना आणि अनियंत्रित मासेमारीची समस्या सोडविण्यासाठी पाळत ठेवून डेटा सामायिक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले. गोवा सागरी परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारताचे नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार, तसेच बांग्लादेश, कोमोरोस, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मॉरिशस, यासह हिंदी महासागरातील १२ राष्ट्रांचे सागरी दलांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत.
हवामान बदलाविषयी सहयोगात्मक चौकटीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत पद्धतींचा स्वीकार करण्यासाठी देशांनी एकत्रित येऊन काम करता येईल, असे सिंह म्हणाले. अनिर्बंध मासेमारीबरोबरच समुद्री चाचेगिरी, हवामान बदल, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, आणि सागरी वाणिज्य स्वातंत्र्य यासारख्या सामायिक सागरी आव्हानांचा प्रभावी सामना करण्यासाठी हिंद महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय सहयोग चौकट स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सागरी प्रदेशाची सुरक्षितता समृद्धता कमी करण्यासारख्या स्वार्थी हितसंबंध टाळून सर्वांचे सहकार्य असले पाहिजे; यावर राजनाथ सिंह यांनी जोर दिला. आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचा आदर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. सागरी नियमांचे पालन करण्यास वचनबद्ध केल्याशिवाय आपली समान सुरक्षा आणि समृद्धी जपली जाऊ शकत नाही कोणत्याही एका देशाने इतरांवर वर्चस्व गाजवू नये याची खात्री करण्यासाठी प्रतिबद्धतेचे वाजवी नियम महत्त्वाचे आहेत,” असेही ते म्हणाले.
सिंह पुढे म्हणाले कि,‘हरित अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी सर्व देशांनी स्वीकारली आणि गरजू देशांसोबत तंत्रज्ञान आणि भांडवल सामायिक केले तर जग या समस्येवर मात करू शकेल.’ संसाधनांच्या बेसुमार वापराचे आव्हान असलेल्या बेकायदेशीर, नोंद नसलेल्या आणि नियमन नसलेल्या मासेमारीचा संदर्भ देताना सिंह म्हणाले की, अशा प्रकारची मासेमारी सागरी परिसंस्था आणि शाश्वत मत्स्यपालन धोक्यात आणते. यामुळे आपली आर्थिक सुरक्षा आणि प्रादेशिक आणि जागतिक अन्न सुरक्षादेखील धोक्यात आली आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी याप्रसंगी बोलताना हिंद महासागर क्षेत्रात शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी या क्षेत्रातील देशांमध्ये सहकार्यासाठी आवाहन केले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी आपल्या भाषणात पारंपरिक व अपारंपरिक सागरी धोक्यांच्या बदलत्या स्वरूपावर भर दिला.