भाजपच्या 'एसटी' नेत्यांत तीव्र मतभेद; टीम तवडकरचा 'संकल्प दिन', तर वेळीप गटाचा 'प्रेरणा दिन'.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:35 PM2023-05-24T12:35:01+5:302023-05-24T12:36:59+5:30
या कार्यक्रमांची राज्यात जोरदार चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : संयुक्त आदिवासी संघटना महासंघाच्या (उटा) आंदोलनात हुतात्मा झालेले मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांचा हुतात्मा दिन कार्यक्रमाच्या आयोजनावरून सध्या मतभेद निर्माण झाले आहेत. यामुळे अनुसूचित जमात संघटनेतील भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यात दुही निर्माण झाल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. प्रकाश वेळीप यांच्या नेतृत्वाखालील संघटना आणि सभापती रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने वेगवेगळे कार्यक्रम ठेवले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांची राज्यात जोरदार चर्चा आहे.
प्रकाश वेळीप यांच्या संघटनेने मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये गुरुवारी (दि. २५) सकाळी १० वाजता प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तर सभापती तवडकर यांच्या संघटनेने काणकोणच्या आदर्श ग्राममध्ये संकल्प दिन कार्यक्रम ठेवला आहे.
उटा आंदोलनात या दोन युवकांनी बलिदान केल्यामुळे उटातर्फे त्यांना श्रद्धांजली दिली जात असल्याचे वेळीप यांनी म्हटले आहे, तर या हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी दरवर्षी आदर्श युवा संघाकडून संकल्प दिन कार्यक्रम केला जातो आणि त्यात यावेळीही खंड पडणार नसल्याचे सभापती तवडकर यांनी म्हटले आहे. विशेष पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली आहे.