पहिल्यांदाच अडला लोलयेतील शिगमा!
By admin | Published: March 3, 2015 01:27 AM2015-03-03T01:27:09+5:302015-03-03T01:30:15+5:30
शेकडो वर्षे पिढ्यान्पिढ्या अखंडपणे चाललेला लोलये गावातील पारंपरिक शिगमा यंदा खंडित झाल्यामुळे लोकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
वासुदेव पागी ल्ल पणजी
शेकडो वर्षे पिढ्यान्पिढ्या अखंडपणे चाललेला लोलये गावातील पारंपरिक शिगमा यंदा खंडित झाल्यामुळे लोकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. पोर्तुगीज राजवटीतही शिगमोत्सवात खंड पडला नव्हता. मात्र, प्रमुख मानकऱ्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे यंदाचा शिगमा अडला
आहे. यामुळे दीडशे वर्षांची परंपरा प्रथमच खंडित झाली आहे.
या गावातील एकूण ६ वाड्यांवरील मिळून एकूण ६ शिगम्याची पथके आहेत, त्यांना शिगम्याचे मेळ असे म्हणतात. या मेळांपैकी ‘वडील’ म्हणजे प्रमुख मेळ मानला जाणारा पोळे येथील मेळ यंदा काढला गेला नाही. मेळ काढणे यालाच ‘मेळ खेळवणे’ असेही म्हटले जाते. येथील दैवत ‘मूळविरा’च्या नावाने काढण्यात येणाऱ्या या मेळाला ‘विरामेळ’ असेही म्हणतात. हा मेळ काढला नाही तर बाकीचे मेळही काढले जात नाहीत, अशी या ठिकाणी प्रथा आहे. त्यामुळे इतर मेळही काढले गेले नाहीत. मेळ पोळे (विरामेळ), मेळ तानशी, मेळ पेडे, मेळ
शेळी, मेळ कोळकण आणि मेळ तामने
असे हे सहा मेळ आहेत.
या गावचा प्रमुख मेळ म्हणजे पोळे मेळ न काढण्याचे कारणही आहे. हा मेळ येथील गावकर, भंडारी, पागी आणि गोसावी समाजातील लोकांच्या एकतेचे प्रतीक मानला जात असून या चारही समाजातील लोकांनी त्याची जबाबदारी घ्यायची असते; परंतु मेळ बाहेर काढण्यासाठी मुख्य विधीची जबाबदारी ही गावकर समाजाची असते. येथील मूळवीर देवाचे प्रतीक मानले जाणारे साहित्य ज्याला ‘पिल्लकचा’ असे म्हटले जाते, ते धरण्याचा मान या कुटुंबीयांना असतो. मोरपिसांनी सुशोभित केलेल्या या पिल्लकच्यात मूळवीर देवाची जटा ठेवली जाते, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे.
(पान २ वर)