‘शिगमोत्सव’ :  गोव्याची सांस्कृतिक ओळख

By सचिन खुटवळकर | Published: March 1, 2018 08:29 AM2018-03-01T08:29:05+5:302018-03-01T08:49:22+5:30

दणदण वाजणारे ढोल, कडाडणारे ताशे आणि कांसाळ्यांच्या (मोठ्या झांजा) तालबद्ध साथीला ‘ओस्सय ओस्सय’ ‘वा वा किती आनंद झाला, गोविंदा रे गोपाळा’ आदी उत्साही व लयबद्ध घोषणांनी दुमदुमणारा आसमंत, गुलाल-रंगांची उधळण यामुळे गोव्यातील शिगमोत्सवाचा माहौल उत्सवी बनतो.

'Shigmotsav': Cultural Identity of Goa | ‘शिगमोत्सव’ :  गोव्याची सांस्कृतिक ओळख

‘शिगमोत्सव’ :  गोव्याची सांस्कृतिक ओळख

googlenewsNext

दणदण वाजणारे ढोल, कडाडणारे ताशे आणि कांसाळ्यांच्या (मोठ्या झांजा) तालबद्ध साथीला ‘ओस्सय ओस्सय’ ‘वा वा किती आनंद झाला, गोविंदा रे गोपाळा’ आदी उत्साही व लयबद्ध घोषणांनी दुमदुमणारा आसमंत, गुलाल-रंगांची उधळण यामुळे गोव्यातील शिगमोत्सवाचा माहौल उत्सवी बनतो. शिमगोत्सवाला स्थानिक भाषेत शिगमोत्सव किंवा शिशिरोत्सव असेही म्हटले जाते. खासकरून ग्रामीण भागात शिगमोत्सवाची विविध रुपे पाहायला मिळतात. सामाजिक बहुसांस्कृतिकरण व आधुनिकीकरणाच्या झळा शिगमोत्सवालाही बसत आहेत; मात्र इथल्या उत्सवप्रिय जनतेने हे सांस्कृतिक दायज (ठेवा) प्राणपणाने जपले आहे.
गावागावात शिगम्याचे स्वरुप बदलत जाताना दिसते. समान्यत: झाड तोडून ग्रामदैवतचे आवाहन करून होळी उभारली जाते. लाकडे व शेणाच्या गोवºया जाळल्या जातात. बहुतेक गावांत रोमटामेळ दिसून येतो. ढोल-ताशे व कांसाळी वाजवत, नाचत-गात गटागटाने लोक गावात दारोदार फिरतात. काही ठिकाणी शिंग (तुतारीसारखे वाद्य) वाजविले जाते. काही गावांत फक्त मंदिराजवळ शिगमोत्सव साजरा होतो. यानिमित्ताने प्रथा, परंपरा पाळल्या जातात. रणमाले हा गायन, नृत्य व नाट्याचा प्रकार उत्तर गोव्यातील झर्मे या गावाने जपला आहे. चोरोत्सव हा विधी उत्तर गोव्यात काही ठिकाणी साजरा होतो. त्याचे स्वरुप गावानुसार बदललेले दिसून येते. गडे उत्सव हे साळ, कुडणे, पिळगाव इथल्या शिगम्याचे वैशिष्ट्य. काही गावांत करुल्यो किंवा करवल्यो हा प्रकार दिसून येतो. स्त्री रुप धारण केलेल्या मुलांची (करुल्यो) खणानारळाने ओटी भरुन पूजा केली जाते. होमखण, घोडेमोडणी, छत्र्यो उत्सव आदी प्रकार वेगवेगळ्या गावांत साजरे होतात.
धुलीवंदनादिवशी शहरी व ग्रामीण भागात रंगपंचमी खेळली जाते. पणजीतील आझाद मैदानावर हजारो नागरिक, देशी-विदेशी पर्यटक या सोहळ्यात सहभागी होतात. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, कलाकार आदींची उपस्थिती असते. किनारी भागात अनेक ठिकाणी गटागटाने खासगी स्वरुपात रंगपंचमी खेळली जाते. डीजेच्या तालावर पाण्याच्या वर्षावात नृत्य, रंगांची उधळण, खाण्यापिण्याची चंगळ असे या रंगपंचमीचे एकंदरित स्वरुप असते. काही ठिकाणी पैसे आकारुन प्रवेश दिला जातो.

गुलालोत्सव, धुळवड-धुळवट...
दक्षिण गोव्यात सासष्टी केपे, काणकोण तालुक्यात काही गावांत आगळावेगळा शिडियोत्सव साजरा होतो. मडगावजवळच्या जांबावलीचा गुलालोत्सव प्रसिद्ध आहे. अशाच प्रकारचा गुलालोत्सव आणखी काही गावांत साजरा होतो. शिगमोत्सव सरताना गुलाल उधळून देवांची पालखीतून जंगी मिरवणूक काढली जाते. काही गावांत धुळवड किंवा ‘धुळवटी’ने शिगमोत्सवाची सांगता होते. या पार्श्वभूमीवर, पूर्वापार चालत आलेली ‘शबय’ ही परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे जाणवते. अलीकडच्या काळात शबय मागणारे तुरळक प्रमाणात दिसून येतात. रोमटामेळात मात्र वाद्यांच्या तालावर ‘शबै शबै शबै शबै शबै...’चा घोष आवर्जून केला जातो.

आदीवासींकडून परंपरांचे जतन
गोव्यात गावडा, कुणबी, वेळीप या जमातींनी आदीवासींच्या पारंपरिक शिगम्याचे जतन केले आहे. पूर्वजांकडून मिळालेला लोकनृत्यांचा, लोकगीतांचा वारसा आदीवासी युवक आणि बुजुर्गांनी समर्थपणे सांभाळला आहे. गोफनृत्य, तोणयामेळ, थेंगे, तालगडी हे विविध खेळांचे (नृत्य) प्रकार आजही तितक्याच जोषात हाताळले जातात. काही आदीवासी ‘शिकमो’ हा वैशिष्ट्यपूर्ण शिगमोत्सव साजरा करतात. धनगर बांधवांचा शिगमोत्सवही चालीरीतींचे जतन करणारा असतो.

शहरी भागात अप्रुप चित्ररथ मिरवणुकीचे
ग्रामीण भागातील गोमंतकीयांची नाळ पारंपरिक शिगमोत्सवाशी जुळलेली असली, तरी शहरी भागात मात्र शिगमोत्सवाने आधुनिक रुप धारण केल्याचे दिसते. हा बदल गेल्या २0 ते २५ वर्षांत घडला आहे. राज्य सरकारतर्फे रोमटामेळ व चित्ररथांची स्पर्धा आयोजित केली जाते. त्यासाठी राजधानी पणजी, मडगाव, म्हापसा, फोंडा, वास्को या प्रमुख शहरांसह तालुक्यांच्या ठिकाणी मिरवणुका आयोजित केल्या जातात. या मिरवणुका पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमते. देशी-विदेशी पर्यटक येतात. पर्यटनवृद्धीसाठी कार्निव्हलच्या धर्तीवरील एक ‘इव्हेंट’ असेच या मिरवणुकीचे स्वरुप बनले आहे. यातील रोमटामेळ हा प्रकार रोमांचक अनुभव असतो.

(लेखक, लोकमत पणजी येथे मुख्य उपसंपादक आहेत)

Web Title: 'Shigmotsav': Cultural Identity of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.