गोव्यात शिवाजी महाराजांविषयी समाज भावना बदलतेय, सोहळे व पुतळ्यांची संख्या वाढतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 02:23 PM2019-02-20T14:23:30+5:302019-02-20T14:42:18+5:30
गोव्यात सरकारी पातळीवरून अनेक वर्षे शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रातील वक्त्यांना बोलावून शिवजयंती साजरी केली जात होती पण यावेळी स्थानिक इतिहास अभ्यासकानेच मुख्य शासकीय सोहळ्यावेळी शिवाजींवर व्याख्यान दिले.
पणजी - गोवा मुक्तीनंतर शिवाजी छत्रपती महाराजांविषयी एक विशिष्ट पण छोटा वर्ग अनादराची भावना व्यक्त करत आला, कारण गोव्यात येऊन पोर्तुगीजांना शह देण्याची शिवाजी व संभाजींची नीती काहीजणांना पटली नव्हती. मात्र ती भावना अलिकडील काही वर्षात खूप म्हणजे खूपच कमी झाली. गोव्यात पूर्वीपेक्षा आता जास्त व्यापक प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे बिगरराजकीय शिवप्रेमींबरोबरच प्रत्येक तालुक्यात आता राजकीय नेते व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग शिवजयंती साजरा करण्याच्या प्रक्रियेत वाढू लागला आहे.
गोव्यात सरकारी पातळीवरून अनेक वर्षे शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रातील वक्त्यांना बोलावून शिवजयंती साजरी केली जात होती पण यावेळी स्थानिक इतिहास अभ्यासकानेच मुख्य शासकीय सोहळ्यावेळी शिवाजींवर व्याख्यान दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, सभापती प्रमोद सावंत, आमदार प्रतापसिंग राणे, राजेश पाटणेकर आदी अनेक नेत्यांनी विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्यात भाग घेतला. त्याविषयीची छायाचित्रेही सोशल मीडियावर झळकली आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना संघटीत करून शिवजयंती साजरी करण्याच्या प्रक्रियेत गेल्या दोन वर्षात राजकारण्यांचा सहभाग वाढला. पंचायत स्तरावरील सरपंचापासून विधानसभेच्या स्तरावरील राजकारणी शिवभक्ती व्यक्त करू लागले आहेत. गोव्यात अनेक निमसरकारी संस्था तसेच शिवप्रेमीही स्वतंत्रपणे शिवजयंती साजरी करत आहेत.
गेल्या तीन-चार वर्षात गोव्यात विविध ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करण्यात आले. साखळीत अश्वारुढ पुतळा उभा झाला. वाळपईत नवा पुतळा बसविला गेला. डिचोलीत पूर्णाकृती पुतळा बसविण्याची घोषणा डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी केली व मंगळवारी त्यांनी ती घोषणा प्रत्यक्षात आणली. सर्व पक्षीय नेते शिवजयंती साजरी करण्याबाबत उत्साह दाखवू लागले आहेत हे स्वागतार्ह आहे पण राजकारण्यांनी शिवाजींचे थोडे तरी गुण घेतले तर समाजाचे कल्याण होईल अशा प्रतिक्रिया काही शिवप्रेमी सोशल मीडियावरून व्यक्त करत आहेत. शिवाजी कधी शिव्या देत नव्हते, असा टोमणा बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी शिवजयंती सोहळ्य़ात दुसऱ्या एका मंत्र्याला उद्देशून मारला. शिवजयंतीनिमित्त मिरवणुकाही गोव्यात वाढल्या आहेत. संभाजी महाराजांच्याही स्मृती जपण्याचा प्रयत्न आता गोव्यात होऊ लागला आहे. अनेक बाजार समित्या गोव्यात शिवजयंती साजरी करू लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शिवजयंतीनिमित्त गोमंतकीयांना सोशल मीडियावरून शुभेच्छाही दिल्या.