गोव्यात येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना २० जागा लढविणार- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 02:12 PM2021-09-12T14:12:17+5:302021-09-12T14:24:12+5:30
येत्या निवडणुकीत हा पक्ष स्वबळावर २० जागा लढविणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केल्याने सेना यावेळी कुठल्याही पक्षाकडे निवडणूकपुर्व युती करणार नसल्याचे स्पष्ट होते.
पणजी : शिवसेना गोव्यात येत्या विधानसभा निवडणुकीत २० जागा लढविणार असल्याचे पक्षाचे महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार तथा गोवा प्रभारी संजय राऊत यांनी मुंबईत सांगितले.सध्या ४० सदस्यीय गोवा विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार नाही. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सेनेने गोव्यात मगोप व गोवा सुरक्षा मंचशी युती करुन तीन जागा लढविल्या होत्या. परंतु एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता आला नाही.
येत्या निवडणुकीत हा पक्ष स्वबळावर २० जागा लढविणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केल्याने सेना यावेळी कुठल्याही पक्षाकडे निवडणूकपुर्व युती करणार नसल्याचे स्पष्ट होते. युतीच्या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी याआधीही असे म्हटले होते की, कुठल्याही समविचारी पक्षाकडे युती केली तर आमच्या वाट्याला दोन किंवा तीन जागा येतात. या जागाही ज्या मतदारसंघांमध्ये आमच्या मनाप्रमाणे नसतात.’गोव्यात भाजप सरकारचा पाडाव करणे हेच शिवसेनेचे लक्ष्य असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, गोव्यात शिवसेनेचे तसे मोठेसे अस्तित्त्व नाही. पेडणे, डिचोली, बार्देस तालुक्यांमध्ये काही ठिकाणी तेवढेच काही प्रमाणात तेवढेच काम दिसते. दक्षिण गोव्यात सांगे भागात काही प्रमाणात कार्य दिसते परंतु अन्यत्र तेवढे अस्तित्त्व नाही.