गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, शिवसेनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 01:43 PM2018-03-13T13:43:15+5:302018-03-13T13:43:15+5:30
गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
पणजी : गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. राज्य नेतृत्त्वहीन बनले असून जनता हवालदिल झाली असल्याचे पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा प्रवक्त्या राखी नाईक यांनी म्हटले आहे.
नाईक म्हणतात की, सरकारात घटक असलेल्या गोवा फॉरवर्डचे नेते नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी स्वत:च राज्यात आणीबाबणीसदृश स्थिती असल्याचे विधान केल्याने सर्व काही स्पष्ट होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे वैद्यकीय उपचारानिमित्त सध्या अमेरिकेत असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत राज्य नेतृत्त्वहीन बनले आहे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच पर्याय आहे.
खाणबंदी तसेच इतर गंभीर समस्या राज्यासमोर असताना राज्याला नेतृत्त्व नसल्याने जनतेच्या प्रश्नांवर बोलणाराही कोणी नाही. १६ मार्चपासून खाणी बंद होणार असल्याने खाणींवरील कामगार, ट्रकमालक, बार्जवाले सर्व संकटात आहेत. त्यांना खोटी आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे. पर्रीकर यांनी स्थापन केलेल्या तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार गटाकडून या प्रश्नावर तोडग्याची अपेक्षा करता येणार नाही. कोणत्याही प्रश्नावर या तिघांमध्ये मतैक्य होणे अशक्य आहे कारण या तिघांची विचारसरणी भिन्न असल्याचे राखी नायक म्हणतात. त्यामुळे या मंत्रिगटाने अजून खाणींच्या प्रश्नावर एकही बैठक घेतलेली नाही.
पर्रीकरांच्या अनुपस्थितीत भाजप नेत्यांवर लोक अवलंबून राहू शकत नाहीत कारण हे नेते तेवढे कार्यक्षमही नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, जेणेकरुन केंद्राच्या हातात सत्ता जाईल आणि गोव्यातील जनतेलाही दिलासा मिळेल. खास करुन खाण भागातील लोकांना दिलासा मिळेल, असे नाईक यांनी म्हटले आहे.
गोव्यात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. शिवसेना हा राज्यातील लहान पक्ष असला तरी सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सेनेने केलेल्या या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.