बंडखोर आमदार गोव्यात कुठे उतरणार? भाजप सरकारची जय्यत तयारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 08:40 PM2022-06-29T20:40:40+5:302022-06-29T20:41:30+5:30
गोव्यातही भाजपचे सरकार असून, हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पणजी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता सर्व बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडले असून, आता ते गोव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. गोवा मार्गे सर्व बंडखोर आमदार मुंबईत जाणार आहे. यातच आता बंडखोर आमदार गोव्यातील कोणत्या हॉटेलमध्ये उतरणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. गोव्यातही भाजपचे सरकार असून, हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गुवाहाटीमध्ये हॉटेल रॅडिसनमध्ये तंबू ठोकून असलेले शिवसेना बंडखोर आमदार आता गोव्यात जाणार आहेत. गोव्यामध्ये हॉटेल ताज कन्व्हेन्शनमध्ये या आमदारांची सोय करण्यात आली आहे. दोना पावला येथील हॉटेल ताजमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी या हॉटेलसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींना हॉटेलमध्ये जाण्यास मनाई आहे.
पंचतारिक हॉटेलमध्ये मुक्काम
बंडखोर आमदार गोव्यातील ताज कन्व्हेन्शन सेंट' या पंचतारिक हॉटेलमध्ये मुक्कामास असणार आहेत. या हॉटेलमध्ये राहण्यासाठी १७ ते २२ हजार रूपये मोजावे लागणार आहेत. गोव्यातील या हॉटेलमध्ये आमदारांसाठी तब्बल ७० रूम बुक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
गोवामार्गे मुंबईला होणार रवाना
बंडखोर आमदार गुरुवारी गोव्यातून मुंबईसाठी रवाना होतील. राज्यपालांकडून विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून सांगण्यात आले आहे. तसेच बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची सुरक्षा दिली आहे. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, गोव्यातही भाजपच्या प्रमोद सावंत यांचे सरकार आहे. गुजरात आणि आसामनंतर आता पुन्हा एकदा बंडखोर आमदार भाजपचे सरकार असलेल्या राज्यात जात आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी बंडखोर आमदार गोव्यातून मुंबईला जाणार आहेत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये आम्हा सर्वांना चांगले सहकार्य मिळाले. महाविकास आघाडीच्या विश्वासदर्शक ठरावात आम्ही सहभागी होणार आहोत. विश्वासदर्शक ठरावानंतर आमच्या विधिमंडळ गटाची एक बैठक होणार आहे. त्यामध्ये पुढील रणनीति ठरवण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.