बंडखोर आमदारांनी मुक्काम ठोकलेल्या हॉटेल आवारातून शिवसेनेचे गोवा सहप्रमुख शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:18 AM2022-06-30T00:18:47+5:302022-06-30T00:19:06+5:30
हॉटेलमध्ये नागरिकांनी जाण्यावर गोवा सरकारने बंदी घातली आहे का? मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणणारी आणीबाणी गोवा सरकारने लावलीय का?, असा सवाल या अटकेनंतर शैलेंद्र यांचे वडील प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे.
पणजी : शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी मुक्काम ठोकलेल्या हॉटेलच्या परिसरात शिवसेनेचे गोवा सहप्रमुख शैलेंद्र वेलिंगकर यांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.
हॉटेलमध्ये नागरिकांनी जाण्यावर गोवा सरकारने बंदी घातली आहे का? मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणणारी आणीबाणी गोवा सरकारने लावलीय का?, असा सवाल या अटकेनंतर शैलेंद्र यांचे वडील प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे. 'आमच्या कुटुंबाबद्दलच्या सूडभावनेतून माझा मुलगा शिवसेनेचा गोवा सहप्रमुख व परशुराम गोमंतक सेनेचा राज्यप्रमुख शैलेंद्र याला अटक केल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला आहे.
ते म्हणाले की, सदर हाॅटेलमध्ये कुतुहलापायी तो गेला असता, गोवा पोलिसानी भाजपा नेत्यांच्या आदेशानुसार त्याला सूडबुद्धीने भादंसंचे १५१ कलम लावून पोलिस कोठडीत टाकले आहे. शैलेंद्रची अटक भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी वैयक्तिक सूडापोटी घडवून आणली. सुडाच्या या राजकारणाचा मी तीव्र निषेध करतो असे त्यांनी म्हटले आहे.
मागे शेळ, मेळावली आंदोलन प्रकरणीही सतीश धोंड व अन्य शीर्षस्थ नेत्यांनी शैलेंद्रला पोलिसांकरवी मारहाण घडवून आणून त्याला शारिरीक इजा पोचवली होती, या अटकेचा मी तीव्र निषेध करीत आहे, असे वेलिंगकर यांनी म्हटले आहे.