म्हापशात रविवारी शिवशौर्य यात्रा; संपूर्ण गोव्यात शिवमय वातावरण
By काशिराम म्हांबरे | Published: October 5, 2023 03:38 PM2023-10-05T15:38:35+5:302023-10-05T15:38:59+5:30
सर्व शिवप्रेमींनी या शिवशौर्य यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
म्हापसा - छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन राज्याभिषेक करवून घेतल्यास यंदा ३५० वर्षे पूर्ण होताहेत. हिंदुत्वाचे जनजागरण करण्यासाठी शिवशौर्य यात्रा संपूर्ण गोव्यातून फिरत आहे. सदर यात्रेचे आगमन रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी म्हापशात होत असून, सायंकाळी ५ वाज. शहरातून भव्य मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात निघणार आहे. त्यानंतर, टॅक्सी स्टॅण्डवर जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
या सभेत अखिल भारतीय बजरंग दलाचे संयोजक नीरज दनोरिया हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे उत्तर गोवा प्रमुख प्रमोद सांगोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रमुख संजय वालावलकर, मंदिर महासंघाचे जयेश थळी, उदय नास्नोडकर, बाबल धारगळकर, प्रशांत परब, सिद्धांत परब, सिद्धांशू साळवी उपस्थित होते.
म्हापसा येथील श्रीदेव बोडगेश्वर मंदिराकडून मिरवणुकीस प्रारंभ होऊन सवाद्य शहरातून फेरी निघेल. या शोभा यात्रेत सर्व हिंदू संघटना, मंदिर समितीचे सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, स्वराज्य गोमंतक आदी संघटना सहभागी होतील. त्याचप्रमाणे, शिवप्रेमी या शिवशौर्य यात्रेत सहभागी होतील. शोभायात्रेपूर्वी टॅक्सी स्टॅण्डवर शिवरायांच्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही जाहीर सभेस उपस्थित राहतील. सर्व शिवप्रेमींनी या शिवशौर्य यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.