अंमली पदार्थ, वाहतूक नियमांविषयी शिवसेनेची जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 01:08 PM2018-08-21T13:08:17+5:302018-08-21T13:12:29+5:30
राज्यात ड्रग्स व तंबाखूजन्य पदार्थांचे प्रमाण दिवसांगणिक वाढत चालले असून ही कीड आता शाळा, महाविद्यालयापर्यंत येऊन पोहोचली आहे.
पणजी : राज्यात ड्रग्स व तंबाखूजन्य पदार्थांचे प्रमाण दिवसांगणिक वाढत चालले असून ही कीड आता शाळा, महाविद्यालयापर्यंत येऊन पोहोचली आहे. मानसिक आरोग्यविषय समस्या, तणाव व मौजमस्तीच्या नावाने विद्यार्थी हे अमंलीपदार्थांच्या आहारी जात आहेत. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण हा चिंतेचा विषय. अतिवेगाने वाहन चालवून स्वत:बरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालणा-यांमध्ये युवकांची संख्या अधिक. या अपघातांत अनेकांनी जीवही गमावले असून बहुतेकजण कायमस्वरुपी पायबंदी झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी
वर्गात जागृती व संवेदनशीलतेची जाण करून देण्यासाठी शिवसेनेच्या गोवा विद्यार्थी संघटनेने (युगोअर्तंगत) खास ‘ नो ड्रग्स’ व ‘वाहतूक नियमांचे पालन’ यासाठी खास मोहीम सुरू केली आहे. याचा श्रीगणेशा मंगळवारी (२१ आॅगस्ट) आल्तिनो-पणजी परिसरातील गोवा वास्तूकला महाविद्यालयातून केला.
यावेळी शिवसेना विद्यार्थी सेनाचे विद्यार्थी निरक्षक आणि प्रभारी चेतन पेडणेकर, विद्यार्थी कक्ष अध्यक्ष मथंन रनकाळे, विद्यार्थी कक्ष
उपाध्यक्ष नेहारीका कामत, सचिव विशाल तांडेल व इतर विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. विद्यार्थी सेनेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना ड्रग्स तसेच वाहतूक नियमांचे महत्त्व विषद केले. या गोष्टींचे पालन करून लोकांमध्ये स्वत:हून मापदंड निर्माण करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी वर्गांकडून या मोहीमेला उत्तम प्रतिसाद लाभला. याविषयी चेतन पेडणेकर म्हणाले, ज्या वयात नवीन ध्येय, संकल्पनाची धारणा मनात बाळगली पाहिजे, त्याच वयात ही युवापिढी भरकटत चाललेली आहे.
विद्यार्थी हे तणाव कमी करण्यासाठी ड्रग्सचा उपयोग करतात. तर काहीजण मानसिक आरोग्यामुळे इतर औषधांचा नशाबाजीसाठी वापर करतात, या गोष्टी त्वरित थांबण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमध्ये वेगाने वाहने चालविण्याचे वेड लागलेले दिसून येते. यात ते स्वत:हून अपघातांना निमंत्रण देऊन या वेगाच्या शर्यतीत दुस-यांच्या जीवही धोक्यात टाकतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना विद्यार्थी संघटनेने ही मोहीम राबविण्यात निर्णय घेतलेला आहे. यापुढे राज्यातील इतर महाविद्यालयांमध्येही ही जागृती करणार असून संबंधित विद्यालयांच्या प्राध्यपकांना निवेदनही देणार असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली.