भाजपसाठी धक्का आणि धडाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2024 09:52 AM2024-06-05T09:52:39+5:302024-06-05T09:53:53+5:30

गोवा भाजप दक्षिणेची जागा जिंकू शकला नाही. 

shock and lesson for bjp for goa lok sabha election 2024 | भाजपसाठी धक्का आणि धडाही!

भाजपसाठी धक्का आणि धडाही!

- सद्‌गुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्वाधिक कष्ट घेतले होते, त्यांच्यासोबत दिगंबर कामत यांनीही घाम गाळला होता, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनीदेखील पल्लवी धेपे जिंकायला हव्यात म्हणून खूप काम केले होते. मात्र, दक्षिण गोव्यातील मतदारांनी साथ दिली नाही. याची कारणे वेगवेगळी आहेत, पण सर्वाधिक आमदार, सर्वाधिक कार्यकर्ते, प्रचंड पैसा आणि सगळी संपत्ती हाती असूनदेखील गोवा भाजप दक्षिणेची जागा जिंकू शकला नाही. 

हा एकप्रकारे सरकारच्या नेतृत्वाचाही पराभव असे कदाचित काही आमदार व लोकही बोलू लागतील, ख्रिस्ती धर्मीय नेते भाजपमध्ये आले तरी, खिस्ती धर्मीय मतदारांनी मात्र कमळाला मत दिले नाही. आम्ही तुम्हाला भाजपच्या चिन्हावर निवडून आणू, पण आम्हाला केंद्रात मोदी सरकार नको, असे अनेक अल्पसंख्याक मतदार भाजपच्या काही ख्रिस्ती आमदारांना प्रचारावेळी सांगत होते. दिगंबर कामतदेखील स्वतःच्या मडगाव मतदारसंघात भाजपला मोठी आघाडी देऊ शकले नाहीत. फक्त १२०० मतांची लीड भाजपला मिळाली. दक्षिण गोव्यात यावेळी हिंदू मतेही फुटली, ती पूर्णपणे भाजपला मिळाली नाहीत असे आकडेवारीवरून कळून येते. नावेली, मडगाव, केपे, कुंकल्ळी, सांगे या मतदारसंघांत भाजप व काँग्रेसला पडलेल्या मतांचा अभ्यास केल्यास हे अधिक स्पष्टपणे कळून येईल. 

पल्लवी धेपे यांना ऐनवेळी भाजपमध्ये घेऊन तिकीट देणे ही भाजपची चूक ठरली. भाजपचा केडर त्यावेळीच हतबल झाला होता. मात्र, नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर यांना राजी करण्यात मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी लगेच यश मिळविले होते, सावईकर यांनी धेपे यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले होते. नुवे मतदारसंघाचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात घेतल्याने सासष्टीत आपली मते वाढतील, असे भाजपला वाटले होते; पण तसे घडले नाही. उलट नीलेश कानाल यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन भाजपने कुडचडेच्या पट्टयातही आपले थोडे नुकसान करून घेतले. सांगे,
सावर्डे अशा काही मतदारसंघांत व एकूणच हिंदू मतदारांच्या पट्ट्यात जे जास्त प्रमाणात मतदान झाले होते, ते सगळे आपल्यासाठीच आहे असा भाजपचा समज झाला होता. मात्र, तो भ्रमाचा भोपळा फुटला आहे. 

२०१९ साली भाजपकडे दिगंबर कामत, रवी नाईक, संकल्प आमोणकर, बाबू कवळेकर, आलेक्स सिक्वेरा, अपक्ष आलेक्स रेजिनाल्ड वगैरे नव्हते. मात्र, यावेळी हे सगळे नेते सोबत असूनदेखील भाजपचा उमेदवार पराभूत झाला. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही यावेळी भाजपला भक्कमपणे साथ दिली तरीदेखील पल्लवी धेपे हरल्या. पल्लवींना राजकारण पुरे झाले असेल, अशी प्रतिक्रिया महिलावर्गातून व्यक्त होत आहे. वास्तविक पल्लवी यांनीदेखील स्वतः खूप कष्ट घेतले होते. त्यांचे पती उद्योगपती श्रीनिवास धेपे यांनीदेखील जिवाचे रान केले होते, दक्षिण गोव्यात त्यांनीही खूप प्रचार केला होता. अनेक क्लबांनाही मदतीचा हात दिला होता, पण काँग्रेसचा विजय कुणी रोखू शकले नाही. 

दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती मतदारांनी आरजीला जास्त मते दिली नाहीत. आरजीला मत दिल्यास भाजपचा लाभ होईल, असा विचार त्या मतदारांनी केला व काँग्रेसला साथ दिली. माविन गुदिन्हो, आलेक्स सिक्वेरा, नीलेश काब्राल, आंतोन वास व अन्य काही खिस्ती नेत्यांमुळे भाजपला खिस्ती मते थोडीफार मिळाली, पण जास्त प्रमाणात मिळाली नाहीत. ती मिळाली असती तर विरियातो यांची आघाडी कमी झाली असती. फ्रान्सिस सार्दिन २०१९ साली जिंकले होते तेव्हा सार्दिन यांना साडेनऊ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यावेळी मगो पक्षानेदेखील सार्दिनना खूप मदत केली होती. मात्र, यावेळी विरियातो जिंकले चक्क साडेपंधरा हजार मतांनी, याचा अर्थ असा की भाजपचे काही आमदार, मंत्रीदेखील दक्षिणेत कमकुवत ठरलेले आहेत, भाजपचे आमदारदेखील जास्त लीड पल्लवी धेपे यांना मिळवून देऊ शकले नाहीत. 

सांगेत सुभाष फळदेसाई हे भाजपला दहा हजार मतांची आघाडी देतील असे मुख्यमंत्र्यांना वाटत होते, पण तिथे पाच हजार मतांची लीड मिळाली. कुंकळ्ळीत भाजपला गेल्यावेळी जेवढी मते मिळाली होती, तेवढीही मते आता मिळालेली नाहीत. तिथे काँग्रेसची आघाडी वाढली. केपे मतदारसंघात बाबू कवळेकर यांनी काँग्रेसची लीड कमी केली, पण तिथे भाजपला लीड मिळू शकली नाही हे भाजपसाठी चिंताजनक ठरले. काँग्रेसने भाजपपेक्षा केप्यात ७४० मते जास्त मिळवली. नावेली मतदारसंघात आमदार उल्हास तुयेकर हे भाजपला आघाडी देऊ शकले नाहीत. तिथे विरियातोंनी बाजी मारली. 

वास्तविक लुईझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दिन, चर्चिल आलेमाव हे यावेळी काँग्रेससोबत नव्हते. ते आतून भाजपसोबतच होते, पण तरीही दक्षिणेत काँग्रेसचा उमेदवार जिंकला. काँग्रेसकडे जास्त निधी नव्हता, भाजपने प्रचंड पैसा खर्च केला, तरीही दक्षिणेत पराभव वाट्याला आला. राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या सभा गोव्यात झाल्या नव्हत्या, दक्षिण गोव्यात पंतप्रधानांची सभा भाजपने आयोजित केली होती. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे आमचा विजय निश्चित, असे भाजप नेते म्हणत होते, पण अपेक्षाभंग झाला. सभांना प्रचंड गर्दी झाली म्हणजे विजय हमखास असतो, असा अर्थ होत नाही हा एक धडाच मिळाला आहे. उत्तर गोव्यात मात्र भाजपचे श्रीपाद नाईक यांनी सहाव्यांदा जिंकत विक्रम केला.

डिचोली व सत्तरी या दोन तालुक्यांनी सुमारे सत्तर हजार मतांची आघाडी भाजपला दिली. साखळी मतदारसंघात पंधरा हजार मतांची आघाडी मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना हायसे वाटले. सत्तरीत सुमारे ३३ हजार मतांची आघाडी श्रीपाद नाईक यांना मिळाली.

 

 

Web Title: shock and lesson for bjp for goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.