युवा महिला डॉक्टरच्या आकस्मिक निधनाने धक्का; शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी बजावताना कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:05 AM2023-08-17T11:05:05+5:302023-08-17T11:06:00+5:30

आई-वडीलच नव्हे, तर रुग्णांसाठीही आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या एका युवा डॉक्टरच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

shocked by sudden death of young female doctor collapsed while performing duty at primary health center in shiroda | युवा महिला डॉक्टरच्या आकस्मिक निधनाने धक्का; शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी बजावताना कोसळली

युवा महिला डॉक्टरच्या आकस्मिक निधनाने धक्का; शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी बजावताना कोसळली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटीवर असलेल्या ३८ वर्षीय डॉ. अक्षया पावसकर यांचे मंगळवारी रात्री आकस्मिक निधन झाले. वृद्ध आई-वडिलांची देखभाल करणारी लेक कायमची हिरावली आहे. आई-वडीलच नव्हे, तर रुग्णांसाठीही आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या एका युवा डॉक्टरच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मूळ मळकर्णे सांगे येथील डॉ. अक्षया काही वर्षांपासून खडपाबांध येथे आपल्या परिवारासह राहत होत्या. मंगळवारी रात्री आरोग्य केंद्रात रात्रपाळीला असताना रुग्णांची विचारपूस केल्यानंतर साडेआठच्या दरम्यान त्या जेवण करण्यासाठी डॉक्टर रूममध्ये गेल्या. त्यानंतर काही वेळाने एक रुग्ण आल्यामुळे त्यांना बोलावण्यासाठी हॉस्पिटलमधील एक सिक्युरिटी गेला.
 
मात्र, त्याच्या हाकेला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्या जेवण करीत असतील असे समजून तो माघारी परतला. परत दहा ते पंधरा मिनिटांनी पुन्हा बोलावण्यासाठी गेला. वारंवार दरवाजा वाजवल्यानंतरही प्रतिसाद न आल्यामुळे त्याने ड्युटीवरील नर्सना सांगितले. त्यांनीही बराच वेळ दरवाजा वाजवून पाहिला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी त्या कॉटवर पडलेल्या आढळल्या. त्यांनी लगेच त्यांना मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

डॉ. अक्षया पावसकर यांच्या मृतदेहावर भिंडे- मळकर्णे, सांगे येथे त्यांच्या मूळ निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांच्या पश्चात वडील मधुकर, आई कालिदी, दोन विवाहित बहिणी, काका, काकी असा मोठा परिवार आहे.

सुशिक्षित व प्रतिष्ठित कुटुंब

डॉ. अक्षया पावसकर यांच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाले आहे. एक बहीण अमेरिकेला तर दुसरी बहीण मुंबईला राहते. अक्षया यांचे मूळ घर मळकर्णे सांगे येते असून, काका-काकू तसेच मोठे कुटुंब आहे. मागील काही वर्षांपासून ते खडपाबांध फोंडा येते राहत आहेत.

कोविडयोद्धा

कोविड काळात डॉ. अक्षया पावसकर यांच्याकडे शिरोडा कोविड केअर सेंटरचा कार्यभार होता. या काळात रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली. त्यांच्या या कार्याची शिरोडावासीयांना आठवण झाली.

अविवाहित राहण्याचा निर्णय

अक्षया यांचे वडील पाच वर्षांपासून कोमात असल्यामुळे त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या काळजीपोटी अक्षया यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. दिसायला देखणी व चांगल्या पदावर कार्यरत असल्यामुळे अनेक मुलांकडून लग्नासाठी प्रस्ताव येत होते. तरीही त्यांनी आपला मनोदय कायम ठेवला, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.

राज्यासाठी ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. अशा प्रकारे एखाद्या युवा डॉक्टरचा मृत्यू होणे ही चिंतेची बाब आहे. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच संबंधितांना याबाबत सखोल चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. - विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री 

 


 

Web Title: shocked by sudden death of young female doctor collapsed while performing duty at primary health center in shiroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा