धक्कादायक! गोव्यात चार बिबटे प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून सुटल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 10:08 PM2018-03-03T22:08:15+5:302018-03-03T22:08:15+5:30
बोंडला अभयारण्यात पहाटेच्यावेळी घुसून अज्ञातांनी पिंजऱ्यांचे दार उघडून चार बिबटयांना मोकळे सोडल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पणजी - बोंडला अभयारण्यात पहाटेच्यावेळी घुसून अज्ञातांनी पिंज-याचे दार उघडून चार बिबटयांना मोकळे सोडल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अभयारण्याबाबत असा अनुभव प्रथमच आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. चारपैकी तिघा बिबटयांना शोधून परत आणण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले. बिबटयाचा एक बछडा मात्र सापडलेला नाही.
बोंडला अभयारण्य हे फोंडा तालुक्याच्या सीमेवर आठ चौरस किलोमीटर क्षेत्रत वसलेले आहे. रोज बरेच पर्यटक आणि गोमंतकीयही या अभयारण्याला भेट देतात. अभयारण्यात विविध विद्यालयांच्या सहलीही सुरू असतात. अभयारण्यात कुणी तरी प्रवेश करून तेथील जनावरांशी खेळ मांडण्याची घटना कधीच घडली नव्हती. शनिवारी मात्र अशी घटना उघडकीस आली.
शनिवारी पहाटेच्या सुमारास कुणी तरी अज्ञात आत आले व त्यांनी दरावाजा तोडला. पिंजऱ्याचे दार उघडे करून त्यांनी चार बिबटयांना सोडून दिले. रात्रीच्यावेळी ज्या पिंजऱ्यात चारही बिबटयांना ठेवले गेले होते, तो दरवाजा उघडा असल्याचे व बछडयासह उर्वरित तीन बिबटे गायब असल्याचे बंदोबस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजता आढळून आले. यामुळे खळबळ उडाली व धावाधाव सुरू झाली.
मंडू आणि अंजली ह्या दोन बिबटयांना लगेच शोधून काढले गेले. बोंडला अभयारण्याच्या परिसरातच ती सापडली. त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पिंजऱ्यात आणण्यात आले. सायंकाळी ज्युली नावाची बिबटयाची मादी शोधून काढण्यात यश आले. बिबटयाच्या बछडयाचा बराच शोध घेतला गेला. तो अभयारण्यातच फिरताना उशिरा दिसून आला. त्याला रात्रीच्यावेळी पिंजऱ्यात आणण्यात आले.
बोंडला अभयारण्यात नेमके कोण घुसले होते व दरवाजा तोडून बिबटयांना मोकळे सोडण्यामागे संबंधितांचा कोणता हेतू होता हे कुणालाच अजून कळालेले नाही. मात्र वन खाते आणि पोलिसही या प्रकरणी चौकशी करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनीही बोंडला अभयारण्याला भेट दिली.
लोकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शनिवारी दिवसभर बोंडला अभयारण्य बंद ठेवण्यात आले. लोकांना व पर्यटकांना आत घेण्यात आले नाही. आज रविवारपासून मात्र अभयारण्य खुले राहील, असे संबंधितांनी कळवले आहे. फोंडा पोलिस स्थानकात याविषयी तक्रारही देण्यात आली आहे.