धक्कादायक: साडेपाच वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू
By पंकज शेट्ये | Published: April 12, 2024 04:43 PM2024-04-12T16:43:44+5:302024-04-12T16:44:08+5:30
मुलीच्या पालकांनी तिला त्वरिच चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले असता तेथे आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
वास्को: वाडे, दाबोळी येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या परिसरात एका साडे पाच वर्षाच्या चिमुरडी मुलीचा संशयास्पद मृतदेह शुक्रवारी (दि.१२) पहाटे आढळला. साडेपाच वर्षाची मुलगी घरी नसल्याचे तिच्या पालकांना समजताच त्यांनी तिचा शोध घ्यायला सुरवात केली असता वाडे येथील बांधकाम चालू असलेल्या परिसरात मुलगी पडलेली असल्याचे त्यांना आढळून आले. मुलीच्या पालकांनी तिला त्वरिच चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले असता तेथे आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास चिखली उपजिल्हा इस्पितळातून वास्को पोलीसांना संपर्क करण्यात आला. इस्पितळात साडे पाच वर्षीय मुलीला तिच्या पालकांनी उपचारासाठी आणलेले असून इस्पितळात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहीती पोलीसांना देण्यात आली. साडे पाच वर्षाच्या मुलीच्या मृत्यूबाबत माहीती मिळताच दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत, मुरगाव उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई, वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी त्वरित इस्पितळात पोचून चौकशीला सुरवात केली. मरण पावलेल्या मुलीचा वडील सुरक्षा रक्षक (वॉचमेन) म्हणून कामाला असून त्याची मुलगी आणि पत्नी तो काम करत असलेल्या परिसरातील जवळच्याच भागात एका खोलीत राहतात. रात्री तो कामावरून खोलीवर पोचला असता त्याची मुलगी घरी नसल्याचे त्याला आढळून आले. अनेकवेळा ते कामावर असताना त्याची मुलगी त्याच्याशी जायची अशी माहीती सूत्रांकडून मिळाली. मुलगी घरी नसल्याचे समजताच त्यांने पत्नीला विचारले असता तीने तिला मुलगी तुमच्याशी असल्याचे वाटल्याचे सांगितले. साडेपाच वर्षाची मुलगी घरात नसल्याचे समजताच तिच्या आई - वडीलांनी तिचा शोध घेण्यास सुरवात केली. आई - वडील मुलीचा शोध घेताना त्यांना त्यांची मुलगी बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या परिसरात पडलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यांनी तिला त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले, मात्र तेथे पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
वास्को पोलीसांनी चौकशीला सुरवात केली असून त्या मुलीच्या मृत्यू मागचे नेमके कारण काय ते शोधून काढण्यासाठी पोलीस सर्व मार्गाने चौकशी करीत आहेत. मुलीच्या मृत्यू मागे घातपाताचा आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय आईने व्यक्त केल्याने पोलीस त्या मार्गाने चौकशी करीत आहेत. साडेपाच वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहीती गोवा पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांना मिळताच त्यांनी त्वरित वास्को पोलीस स्थानकावर येऊन त्या प्रकरणात चौकशी कुठे पोचली आहे त्याबाबत दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत, पोलीस उपअधीक्षक संतोश देसाई इत्यादी अधिकाऱ्यांकडून माहीती घेतली. तसेच त्यांनी ह्या प्रकरणात कशा प्रकारे चौकशी करावी त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बांधकाम चालू असलेल्या त्या इमारतीत काम करणाऱ्या कामगारांना आणि अन्य काही जणांना वास्को पोलीसांनी चौकशीसाठी पोलीस स्थानकावर नेले. त्या घटनेबाबत अधिक माहीतीसाठी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांना संपर्क केला असता साडेपाच वर्षीय मुलीच्या मृतदेहावर पंचनामा करून तो शवचिकीत्सेसाठी मडगावच्या जिल्हा इस्पितळात पाठवून दिल्याचे सांगितले. तिच्या मृत्यू मागचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी पोलीस सर्व मार्गाने चौकशी करत असल्याची माहीती त्यांनी दिली. मृत मुलीच्या नाकात काही प्रमाणात फेस जमा झाल्याचे तिच्या मृतदेहावर पंचनाम करताना दिसून आल्याची माहीती पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. त्या मुलीवर शवचिकीत्सा झाल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून तिच्यावर अत्याचार झाला होता की नाही ते स्पष्ट होणार असल्याची माहीती त्यांनी दिली. वास्को पोलीस ह्या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.