गोव्यात मराठी, हिंदी मालिकांचे चित्रीकरण धडाक्‍यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 09:33 PM2021-04-30T21:33:26+5:302021-04-30T21:38:14+5:30

Shooting of Marathi and Hindi serials in Goa : लॉकडाऊनच्या काळातही मालिकांचे भाग गोव्यात चित्रीत केले जात आहेत. चित्रीकरणासाठी अनेक कलाकारही गोव्यात आहेत.

Shooting of Marathi and Hindi serials in Goa in Corona Pandemic | गोव्यात मराठी, हिंदी मालिकांचे चित्रीकरण धडाक्‍यात!

गोव्यात मराठी, हिंदी मालिकांचे चित्रीकरण धडाक्‍यात!

googlenewsNext

पणजी : देशात इतरत्र महामारीमुळे चित्रीकरणाच्या बाबतीत सामसूम असताना गोव्यात मात्र मराठी आणि हिंदी मालिकांचे चित्रीकरण धडाक्‍यात सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळातही मालिकांचे भाग गोव्यात चित्रीत केले जात आहेत. चित्रीकरणासाठी अनेक कलाकारही गोव्यात आहेत. स्टार प्लस हिंदी चॅनलवरील ' ये है चाहतें', 'शौर्य और अनोखी की कहानी', 'आप की नजरोंनें समझा' तसेच  'गुम है किसी के प्यार में' तर मराठी स्टार प्रवाह चॅनलवरील 'सुख म्हणजे नक्की काय असते', ' रंग माझा वेगळा,' झी मराठीवरील 'अगंबाई, सुनबाई', तसेच कलर्स मराठीवरील 'ऑनलाइन शुभमंगल' या मालिकांचे चित्रीकरण गोव्याच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात चालू आहेत. अनेक ठिकाणी हॉटेले किंवा व्हिल्ला भाड्याने घेऊन शूटिंग केले जात आहे.  हर्षदा खानविलकर, रेश्मा शिंदे, आशुतोष गोखले, अनघा भागरे आदी मराठी कलाकार तर अब्रार काझी, सर्गुन कौर लुथ्रा, नील भट, ऐश्वर्या शर्मा, करणवीर शर्मा, तनू खान, ऐश्वर्या सखुजा आदी हिंदी कलाकार गोव्यात आहेत.

राज्यात किमान २० ठिकाणी सध्या चित्रीकरण चालू आहे. लाईन प्रोड्युसर दिलीप बोरकर म्हणाले की, ' वेगवेगळ्या मालिकांचे चित्रीकरण गोव्यात चालू असले तरी कलाकार किंवा चित्रीकरण चमूचा कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी संबंध येत नाही. हॉटेलांमध्ये किंवा व्हिल्लांमध्ये अंतर्गतच चित्रीकरण चालते. जेवण - खाण तेथेच होते. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी चित्रीकरण बंद आहे.  गोव्यात जर आज फिल्मसिटी असती तर येथील राज्य सरकारला  आर्थिक  फायदाही झाला असता. आज निर्माते भाड्याने हॉटेल घेऊन चित्रीकरण करीत आहेत. फिल्मसिटीची मागणी गेल्या दहा वर्षांपासून आम्ही सातत्याने करत आहोत. बोरकर म्हणाले की, 'गोव्यात कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने मी स्वतः तीन दिवसापूर्वी माझे शूटिंग बंद केले आहे. 

मराठी किंवा हिंदी मालिकांचे निर्माते व सिनेनिर्माते निसर्ग आकर्षणामुळे चित्रीकरणासाठी गोव्यात येतात. दरम्यान, गावांमध्ये चित्रीकरणाला विरोध होऊ लागला आहे. नेरूल येथे नुकतीच अशीच घटना घडली होती. प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊन दोन टॅक्सी व्यवसायिकांनाही अटक झाली होती. दोन दिवसांपूर्वी सुकूर येथे एका ठिकाणी चित्रीकरण चालू होते त्यावरूनही गोंधळ उडाला होता. स्थानिक पंचायत तसेच पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवे , अशी मागणी काही लोक करीत आहेत. लॉकडाऊनमुळे पुणे, मुंबई आदी ठिकाणी चित्रीकरण केले जात नाही. त्यामुळे निर्मात्यांनी गोव्याकडे मोर्चा वळवला आहे. गोव्यात कुठेही शूटिंग करताना गोवा मनोरंजन संस्थेची परवानगी घ्यावी लागते. नियमानुसार गोवा लाईन प्रोड्युसर संघटनेमार्फत यावे लागते.
 

Web Title: Shooting of Marathi and Hindi serials in Goa in Corona Pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.