ब्रिक्स परिषदेच्यावेळी पोलिसांना निकृष्ट दर्जाचे जेवण, केटररला कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 02:20 PM2019-06-30T14:20:22+5:302019-06-30T14:24:16+5:30
ब्रिक्स परिषदेच्यावेळी ड्युटीवरील पोलिसांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविल्या प्रकरणी दक्षिण गोवा पोलीस अधिक्षकांनी डिचोली येथील मेसर्स आमोणकर क्लासिक केटरर्सला ४२ लाख रुपये रक्कम जप्त का करु नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटिस बजावली
पणजी - २0१६ साली दक्षिण गोव्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेच्यावेळी ड्युटीवरील पोलिसांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविल्या प्रकरणी दक्षिण गोवा पोलीस अधिक्षकांनी डिचोली येथील मेसर्स आमोणकर क्लासिक केटरर्सला ४२ लाख रुपये रक्कम जप्त का करु नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
आयरिश रॉड्रिग्स यांनी सादर केलेल्या तक्रारीवरुन राज्य मानवी हक्क आयोगाने ३0 एप्रिल रोजी अंतिम आदेशात या केटरर्सला दंड ठोठावण्याचे निर्देश पोलिस महासंचालकांना दिले होते. घटनेच्या कलम २१ ने प्रत्येकाला हक्क दिलेला आहे. ड्युटीवरील पोलिसांना निकृष्ट दर्जाचे जेवण देऊन कंत्राटदार केटटर्सने हा हक्क हिरावून घेतल्याचा दावा केला होता.
१४ ऑक्टोबर २0१६ रोजी दक्षिण गोव्यात ब्रिक्स परिषद झाली. त्यावेळी ड्युटीवरील पोलिसांना जेवण पुरविण्यासाठी तब्बल ५१ लाख ६0 हजार रुपयांचे कंत्राट मेसर्स आमोणकर क्लासिक केटरर्सला देण्यात आले होते त्यासाठी योग्य त्या निविदाही काढल्या नाहीत. या केटररने अन्य एकाला उपकंत्राट दिले आणि वेर्णा येथे खुल्या जागेत अन्नपदार्थ शिजविण्यात आले. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ पोलिसांना पुरविले गेले, असा आयरिश यांचा दावा असून या कंपनीला कंत्राटाची रक्कम फेडू नये, अशी मागणी त्यांनी केली होती.
पोलीसही माणूस आहेत आणि त्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे याचिकादाराचे म्हणणे असून पोलिसांनाही माणसाप्रमाणे वागणूक द्या, त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा द्या, असे राज्य मानवी हक्क आयोगाने वेळोवेळी बजावले असतानाही सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही, याकडेही आयरिश यांनी लक्ष वेधले आहे.